
राज्य सरकारमध्ये काहीच अलबेल नाही. असं असतं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रोखला गेला नसता. एक वर्षापासून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. केंद्र सरकारने हा विस्तार रोखून धरला आहे. अशी टीका ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नाही. शिंदे हा खुळखुळा आहे. त्यांच्या हातात ना मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे अधिकार आहेत, ना राज्याबाबत निर्णय घेण्याचे. भ्रष्ट मंत्र्यांना बाहेर काढा आणि मग विस्तार करा, असा एकच आदेश त्यांना आहे, असं राऊत यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे.
सेना- भाजपात सुरु असलेल्या धुसफूसवर बोलताना ते म्हणाले की, फेव्हिकॉलचा ट्यूब आहे ते पाहावं लागेल. फेव्हिकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत ते पाहावं लागेल. फडणवीस यांच्या प्रवक्त्यांने बेडकाची उपमा दिली हा फेव्हिकॉलचा जोड म्हणायचा का? काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते. फेव्हिकॉलका जोड बिड काही नाही. येत्या दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागले. त्यानंतर सरकार कोसळेल. असं ते म्हणाले आहेत.
यावेळी त्यांना आलेले धमकीचे कॉल हे बनाव असल्याची टीका भाजप आणि मनसेकडून करण्यात आली होती. यावर बोलताना त्यांनी बनाव रचून काय करायचं? असा बनाव मूर्ख लोक रचतात. गेल्या वर्षभरात अश्या अनेक घटना घडल्या आहेत. मधल्या काळात पुण्यात एक व्यक्ती पकडली गेली. ती रावसाहेब दानवे यांच्या गावाची होती. मग दानवे यांनी बनाव रचला होता का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मयुर शिंदेचा माझ्या बरोबर फोटो असेल. पण त्याने रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मिंधे गटात आहेत. जर तो बनाव असता तर फोन नंबरसह पोलिसांना कळवलं नसतं. मला धमक्या येत आहे. अलिकडे फोन नंबरवरुन माणसं ट्रेस होतात. लोकेशन ट्रेस होतं. हे न समजण्या इतके आम्ही दूधखूळे नाही आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.