शिंदे रुसले, शहांना भेटले! फडणवीस यांची अजित पवारांसोबत खलबते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान नेत्यांच्या फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची खरडपट्टी काढल्यानंतर भाजप-शिवसेना गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे.
शिंदे रुसले, शहांना भेटले! फडणवीस यांची अजित पवारांसोबत खलबते
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुतीतील नाराजीनाट्य बळावले असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान नेत्यांच्या फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची खरडपट्टी काढल्यानंतर भाजप-शिवसेना गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करत पुढील रणनीती ठरवल्याची चर्चा आहे.

बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झालेल्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास तासभर अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. पदाधिकारी फोडाफोडी तसेच राज्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिंदे यांनी अमित शहांकडे गाऱ्हाणे मांडले. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला, त्यांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याची तक्रार शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीत लढवल्या जातील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजपने वेगळी चूल मांडली आहे. त्यावरूनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. अमित शहा यांच्यासोबतच शिंदे हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. एक दिवसाच्या दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे गुरुवारी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदेंची वाढती नाराजी दूर कशी करायची, याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच तर पुढे काय करायचे याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये तीन पक्षांत आलबेल नसल्याचे उघड झाले आहे.

एकनाथ शिंदे रडणारा नाही, लढणारा आहे!

अमित शहा यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे आणि आपण ते वेळोवेळी पाहिले आहे. छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो.

logo
marathi.freepressjournal.in