महाराष्ट्रात ४ जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप; भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा

कंबोज यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय खळबळ उडविण्यासाठी आहे की, यात खरोखरच तथ्य आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र एएनआय
Published on

प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्रात ४ जून म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांत पुन्हा एकदा फूट पडणार असून या दोन्ही पक्षांतून आमदार, नेते राजीनामे देऊन बाहेर पडतील, असा खळबळजनक दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. आता पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर सगळयांचे लक्ष ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी खळबळजनक दावा एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करून केला आहे. “येत्या ४ जून रोजी निकाल लागतील, त्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटातील अनेक आमदार, नेते हे राजीनामे देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत.” मात्र हे आमदार नेमक्या कोणत्या पक्षाच्या संपर्कात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. अर्थातच ते सत्ताधारी पक्षाच्या संपर्कातच असणार हे स्पष्टच आहे.

मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कंबोज यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय खळबळ उडविण्यासाठी आहे की, यात खरोखरच तथ्य आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. येत्या ४ जूननंतरच कंबोज यांचे भाकीत खरे ठरते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

अर्धा भाजप फुटेल -उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत ५ जून रोजी अर्धा भाजप फुटलेला दिसेल, असे भाकीत वर्तविले आहे. “तुम्ही सगळे गद्दार जमविले आहेत. आमची सत्ता आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा आमच्या हातात असेल. मग यांच्या शेपट्या कशा पकडतो, ते बघा,” असे उद्धव ठाकरे नाशिकच्या सभेत म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in