श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थ गाठत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली.
श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट
Published on

प्रतिनिधी/मुंबई

कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थ गाठत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत ठाणे मतदारसंघात उमदेवारी घोषित झालेले नरेश म्हस्केदेखील होते. सोबतच भाजपचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिहिर कोटेचा यांनीदेखील महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

“राज ठाकरे यांनी आधीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आपल्यालाही राज ठाकरे यांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. कल्याण आणि ठाणे येथे राज ठाकरे यांच्या सभा व्हाव्यात, अशीच आमची इच्छा आहे. याचा निर्णय राज ठाकरेच घेतील,” असे श्रीकांत शिंदे यांनी नंतर सांगितले. त्यामुळे राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रचारात प्रत्यक्ष उतरतात का, हे पाहावे लागणार आहे.

कल्याणसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि भाजपाचे मिहीर कोटेचा यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. श्रीकांत शिंदे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदनही केले.

logo
marathi.freepressjournal.in