सुलतान शब्दावरुन शिंदे गट आक्रमक; संजय राऊत औरंगजेबाच्या दरबारातील हुजरे असल्याची केली टीका

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख सुलतान, डेप्युटी सुलतान असा केला होता
सुलतान शब्दावरुन शिंदे गट आक्रमक; संजय राऊत औरंगजेबाच्या दरबारातील हुजरे असल्याची केली टीका

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. यानंतर शिवसेनेचे ठाकर गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरुन राज्यात नामर्दांचं सरकार आहे. असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत त्यांनी सुलतान, डेप्युटी सुलतान असा केला. त्यावर शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुलतान आणि डेप्युटी सुलतान म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही अजून मोगलाईतून बाहेरच आला नाही आहात. साडेतीनशे वर्षांची सल्तनत आणि सुलतानशाही संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. सुलतानाचं नाव घेणाऱ्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारातले हुजरेच आहात. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या देशात लोकशाही आणली, तुम्ही तर अजून मोगलाईचीच भाषा बोलत आहात. मग राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि पाकिस्तानचा पासपोर्ट काढून तिथे जा आणि खुशाल तिथल्या सुलतानांच्या दरबारात मुजरे करा, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागाल होता. असं असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात व्यग्र असल्याची टीका राऊत यांनी केली होती. अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलताना आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये तर कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर निवडणुका थांबल्या असत्या, अशी टिका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केली होती.

logo
marathi.freepressjournal.in