काही शक्ती जाती-धर्मामध्ये अंतर निर्माण करुन दंगली घडवत आहेत - शरद पवार

जे कर्नाटकात होऊ शकते, ते देशातील कोणत्याही राज्यात होऊ शकते, त्यासाठी प्रयत्न करत राहणे हे आपले काम असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
काही शक्ती जाती-धर्मामध्ये अंतर निर्माण करुन दंगली घडवत आहेत - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही शक्ती अहमदनगरमध्ये धर्माच्या नावाने दंगली घडवू पाहत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्यातील लोकांचे उदाहरण दिले. कर्नाटकात काही लोक सत्तेचा वापर करुन द्वेष पसरवत होते. मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तसेच जे कर्नाटकात होऊ शकते, ते देशातील कोणत्याही राज्यात होऊ शकते, त्यासाठी प्रयत्न करत राहणे हे आपले काम असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. आज (21 मे) रविवार रोजी ते अहमदनगर येथे बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, "धर्माच्या नावाने अंतर वाढवले जाते आहे. अहमदनगर हा पुरोगामी जिल्हा आहे. अनेक ऐतिहासिक काम करणारे लोक या जिल्ह्यात होऊन गेले. नगरमधील शेवगावला दोन-तीन दिवस बाजारपेठ बंद होती. काही अदृश्य शक्ती जातींमध्ये अंतर वाढवत असून संघर्ष निर्माण करत आहेत. त्यांच्याशी लढाई करण्याचे, संघर्ष करण्याचे आव्हान माझ्यासह आपल्या सर्वांवर आहे. आपण ते केले नाही तर कष्टकरी लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही." असे देखील पवार यावेळी म्हणाले.

यावेळी कर्नाटकविषयी बोलतान ते म्हणाले की, "मी काल बंगळूर येथे होतो. देशातले चित्र बदलत आहे. त्या लोकांनी त्यांच्या सत्तेच्या काळात लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले. सर्व देशात कर्नाटक निवडणूक सत्ताधारी भाजप जिंकेल असे वाटले होते. मात्र काल सामान्य माणसांच्या सरकारचा शपतविधी झाला. यावेळी एक लाख लोक उपस्थित होते. यातील 70 टक्के संख्या ही तरुणांची होती." असे देखील ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in