
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या दोन्ही नेत्यांकडून ही भेट कौटुंबीक असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत मात्र या भेटीमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. अनेकांनी याबाबत उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली आहे.
या भेटीनंतर भाजपने अजित पवार यांच्या मार्फत शरद पवारांना ऑफर दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हाला कुठलीही ऑफर आली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाचं अध्यक्षपद देण्याची ऑफर भाजपने दिली असल्याचं सांगितलं. तर सुप्रिया सुळे यांनी केंद्रात तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्री बनवणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे.
या दाव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला असली कुठलीही ऑफर नाही हे मी स्पष्ट शब्दात सांगते. काँग्रेस काय विधान करते हे मला माहिती नाही. आम्ही याबाबत राहुल गांधी सोनिया गांधींशी बोलू. संसदेत आम्ही काँग्रेस सोबत बसतो. रणनिती बनवतो. त्यामुळे त्यांच्या राज्यातील नेतृत्वावर बोलणं उचित नाही. काँग्रेसच्या नेतृत्वावर मी काही टीका करणार नाही, असं सुळे म्हणाले.
ऑफरविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, १५ ऑगस्टचे सगळीकडे सेल सुरु आहे. त्याचं ऑफर फक्त मला माहिती आहे. इतर कुठलीही ऑफर माहिती नाही. काँग्रेसने केलेल्या विधानावर तेच बोलू शकतात. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी आम्ही सातत्याने चर्चा करुन संसंदीय कामकाचाबद्दल रणनिती ठरवतो, असं देखील त्या म्हणाल्या.