आंध्र प्रदेशात तेलगू देसम‌्-भाजपचे सरकार, चंद्राबाबू ठरले जायंट किलर

आंध्र प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम‌्-भाजप आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आंध्र प्रदेशात तेलगू देसम‌्-भाजपचे सरकार, चंद्राबाबू ठरले जायंट किलर
PTI

अमरावती : आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम (टीडीपी)-भाजप युतीला बहुमत मिळाले आहे. टीडीपी १३५ जागांवर आघाडीवर असून जेएनपीला २१ तर भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत. तर विद्यमान सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या. तर काँग्रेस व अन्य पक्षांना एकही जागा मिळाली नाही. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात टीडीपीला ६३, जनसेना पार्टीला १३ तर भाजपला ४ जागी विजय मिळाला आहे.

आंध्रातील १७५ विधानसभा निवडणुकीत जोरदार लढत होती. या राज्यात बहुमतासाठी ८८ जागा जिंकाव्या लागतात. या विधानसभा मतदारसंघात टीडीपी, जनसेना पार्टी व भाजप एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत.

लोकसभेत १६ जागांवर विजय

यंदा लोकसभा निवडणुकीत आंध्रमध्ये तेलुगू देसम‌् पक्षाने १६ जागांवर आघाडी घेतली असून भाजपने २ जागांवर विजय आहे. पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षाने २ जागांवर आघाडी घेतली आहे.

चंद्राबाबू ठरले जायंट किलर

अमरावती : पाच वर्षांपूर्वी पराभव झाल्यानंतर टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी राज्य पिंजून काढले होते. मी मुख्यमंत्री बनल्यानंतरच पुन्हा विधानसभेत प्रवेश करेन, असे नायडू यांनी विधानसभेत जाहीर केले होते. आज नायडू यांनी आपली शपथ पूर्ण केली आहे. नायडू यांच्या नेतृत्वाखाली टीडीपीला १७५ पैकी १३५ जागा मिळाल्या आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत टीडीपीला केवळ २३ जागा मिळाल्या होत्या. तर लोकसभेच्या २५ पैकी १६ जागा डीटीपीने खिशात टाकल्या आहेत. भाजप तीन तर जनसेना पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत.

रालोआत भाजपनंतर सर्वात दुसरा मोठा पक्ष टीडीपी ठरला आहे. आता भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांना टीडीपी व जनता दलाचा (युनायडेट) पाठिंबा लागणार आहे.

आंध्र प्रदेशात रालोआला तीन जागा, १८ जागांवर आघाडी

अमरावती : आंध प्रदेशातील लोकसभेच्या तीन जागा रालोआने जिंकल्या असून १८ जागांवर आघाडी घेतली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, नरसापुरम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बी. श्रीनिवास वर्मा हे विजयी झाले आहेत. वर्मा यांनी वायएसआरसीपीचे जी. उंबाळा यांचा २.७६ लाख मतांनी पराभव केला. वर्मा यांना ७,०७,३४३ मते पडली. तर उंबाळा यांना ४,३०,५४१ मते पडली. आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी या राजमुंद्री लोकसभा मतदारसंघातून २.३९ लाख मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७,२६,५१५ मते पडली. तर जी. श्रीनिवास यांना ४,८७,३७६ मते मिळाली. टीडीपीचे के. शिवनाथ यांनी वायएसआरसीपीचे के. श्रीनिवास यांचा विजयवाडा मतदारसंघात २.८२ लाख मतांनी पराभव केला. शिवनाथ यांना ७,९४,१५४ मते मिळाली तर के. श्रीनिवास ५,१२,०६९ यांना मते मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in