लोकसभेत झालेली खटपट विधानसभेच्या वेळी नको! छगन भुजबळ यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत.
छगन भुजबळ
छगन भुजबळसंग्रहीत फोटो
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली, ती खटपट विधानसभा निवडणुकीत होता कामा नये, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी दिला.

आपण महायुतीत आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील, असे सांगितले होते. ८०-९० जागा मिळाल्या तर कुठे आपले ५० ते ६० आमदार निवडून येतील, अन्यथा तुमचे ५० आहेत, मग पन्नासच घ्या, त्यातून मग पुन्हा किती निवडून येणार? असे होता कामा नये, असा इशाराही छगन भुजबळ यांनी भाजपला दिला.

जागावाटपाबाबत काळजी नकाे - अजित पवार

मागील विधानसभा निवडणुकीत आपण ५४ जण निवडून आलो होतो. आता २८८ जागांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यावेळी काय होईल याची आपणा सर्वांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, जागावाटपाबाबत काळजी करू नका. कारण जागावाटपात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि माझ्या सर्व जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मानसन्मान ठेवला जाईल, अशी खात्री अजित पवार यांनी दिली.

जागांमध्ये नक्कीच वाढ होईल - प्रफुल्ल पटेल

विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखे चित्र असणार नाही, एवढी खबरदारी अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांच्यासह पक्षातील इतर जबाबदार व्यक्तींनी देखील या गोष्टीची काळजी घेतली असून, विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळणाऱ्या जागांमध्ये नक्कीच वाढ होईल. आपले आत्ता किती विद्यमान आमदार आहेत किंवा नाहीत हा विषय त्या चर्चेत नसेल. जागावाटपाच्या चर्चेत आपण सर्वजण सहभागी असणार आहोत, अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांची समजूत काढली.

भाजपला जास्त जागा मिळतील - फडणवीस

विधानसभेमध्ये तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तीनही पक्षांना जागा मिळतील. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in