विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद विधिमंडळाला मिळालेला नसल्याने हे अधिवेशनही अध्यक्षांशिवाय पार पडणार आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात व्हावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची चर्चा झाली असून सरकारच्यावतीने राज्यपाल कोश्यारी यांना तसे पुन्हा कळवण्यात येणार आहे. यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची अधिवेशन सुरु होण्यापूर्वी भेट घेऊन त्यांना याबाबत स्मरण करून दिले होते.
या विषयावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. ‘सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत कळविण्यात येणार आहे. आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला आहे. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की नाव जाहीर करू,’ असे पटोले म्हणाले.