सिक्कीममध्ये पुन्हा ‘एसकेएम’ची सत्ता! ३२ पैकी ३१ जागांवर विजय; राज्य विधानसभेत विरोधी पक्ष नगण्य

सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत रविवारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला.
सिक्कीममध्ये पुन्हा ‘एसकेएम’ची सत्ता! ३२ पैकी ३१ जागांवर विजय; राज्य विधानसभेत विरोधी पक्ष नगण्य
@PSTamangGolay/ X
Published on

गंगटोक : सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत रविवारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला. राज्य विधानसभेच्या ३२ जागांपैकी ३१ जागा पटकावून प्रचंड बहुमताने एसकेएम पुन्हा एकदा सत्तेवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमेसिंग तमंग हे ऱ्हेनॉक आणि सोरेंग चाकुंग अशा दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत.

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) पक्ष २०१९ पर्यंत सलग २५ वर्षे सत्तेवर होता. यावेळी त्या पक्षाला केवळ एकच जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल रोजी सिक्कीम विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले होते. सिक्कीमचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिल्लीराम थापा हे अप्पर बुर्तुक मतदारसंघातन पराभूत झाले. त्यांचा ‘एसकेएम’चे उमेदवार काला राय यांनी पराभव केला.

‘एसडीएफ’चे नेते आणि माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग हे पोकलोक कामरांग व नामचेयबंग या दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले आहेत. चामलिंग यांनी सिक्कीमचे पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. तसेच ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

मोदींकडून ‘एसकेएम’चे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमंग आणि ‘एसकेएम’चे अभिनंदन केले आहे. सिक्कीमच्या अधिकाधिक प्रगतीसाठी राज्य सरकारसमवेत काम करण्याची इच्छा असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतिया पराभूत

प्रसिद्ध फुटबॉलपटू व ‘एसडीएफ’चे उपाध्यक्ष बायचुंग भुतिया हे बारफंग मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांचा ‘एसकेएम’चे उमेदवार रिक्शाल दोरजी भुतिया यांनी पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in