गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक तर्क वितर्त लढवले जात आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांनी हे बंड मुख्यमंत्री पदासाठी केलं असून त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द भाजप पक्षश्रेष्टींनी दिला असल्याचं म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची मनिषा देखील लपून राहीलेली नाही.
आधीच अजित पवार यांच्यावर बंडाचं खापर फोडत फोडत शिवसेनेचा एक गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. यानंतर अजित पवार हेच सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची गोची झाली. अजित पवार यांना अर्थखात देण्याला अनेक आमदारांनी विरोध केला होता. तसंच यामुळे अनेक जण नाराज असल्याचं देखील सांगण्यात येत होतं. आता अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांमुळे शिवसेनेतील अस्थिरता शिगेला पोहोचली असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याबाबत अनेक दिग्गज रायकीय नेत्यांनी भविष्यवाणी केली आहे. अशात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटने देखील राजकीय वर्तूळात चर्चांना उधाणं आलं होतं. आता शिवसेनेचे नाराज आमदार ही बाब समन्वय समितीच्या निदर्शनास आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.