तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता मंगळवारी, ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

मुंबई/नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता मंगळवारी, ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. देशभरात तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९५ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डिंपल यादव, शिवराज सिंह चौहान, सुप्रिया सुळे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले, नारायण राणे, प्रणिती शिंदे, सुनील तटकरे, अनंत गीते, धैर्यशील मोहिते-पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील १३५१ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरातच्या २६ मतदारसंघांत ६५८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात ११ जागांसाठी ५१९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील दोन, पुणे विभागातील ७ तर औरंगाबाद विभागातील २ अशा एकूण ११ मतदारसंघांत मतदान होईल. या ११ मतदारसंघांत रायगड, बारामती, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. या ११ मतदारसंघांत प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले होते.

यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढाई आहे. मुख्य लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे. बारामतीचा गड शरद पवार राखणार की अजित पवार विजयी धडक देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे रविवारी शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही बारामतीत सांगता सभा घेतल्या.

या ११ मतदारसंघांत २ कोटी ९ लाख ९२ हजार ६१६ पात्र मतदार आहेत, तर २३ हजार ३६ मतदान केंद्रे आहेत. एकूण २५८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

अशी आहे मतदानाची वेळ

तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांत ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. संध्याकाळी सहा वाजता जे मतदार मतदानकेंद्राच्या परिघात उपस्थित असतील त्यांना रात्री कितीही वाजले तरी मतदान करता येणार आहे. राज्यात वाढत्या उन्हाच्या चटक्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. मतदान केंद्रात मंडप, पिण्याचे पाणी, ओआरएसची पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.

११ मतदारसंघांत महाराष्ट्रात मतदान

राज्यातील ११ मतदारसंघांत ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लोकसभेच्या या ११ मतदारसंघांत रविवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात या ११ मतदारसंघांत अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in