पवारांपाठोपाठ ठाकरेही पळवले!

राष्ट्रवादीतील नेते अजित पवार हे महायुतीत आले असले तरी त्यांना पवार कुटुंबीयांशी संघर्ष करावा लागत आहे. शरद पवारांबरोबर त्यांचे नातू आमदार रोहित पवारही असून काल-परवा तर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हेही शरद पवारांच्या गटात सामील झाले आहेत.
पवारांपाठोपाठ ठाकरेही पळवले!

- अरविंद भानुशाली

मतं आणि मतांतरे

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने २० लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर केल्याने त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा प्रथम केला तर अजून महाविकास आघाडीत जैसे-थे परिस्थिती असल्याचे बुधवारपर्यंत दिसून येते.

महायुतीत आता राज ठाकरे सामील होत झाल्याने चौथा भिडू बरोबर आला आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न पवार कुटुंबीयांनी करायला घेतला आहे. उद्या दस्तुरखुद्द शरद पवार माढा मतदार संघातून जुन्या सहकाऱ्यांना भाजपमधील असंतुष्टांना बरोबर घेऊन निवडणूक लढवू शकतात. इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत शरद पवार कुटुंबीय व समर्थक आले आहेत.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जवळजवळ संपविण्याचा विडा भाजप- मोदींनी उचलला असून त्याचाच एक भाग म्हणजे अजित पवारांपाठोपाठ राज ठाकरेंना आपल्या तंबूत घेतले आहे. विशेष म्हणजे अमित शहा व राज ठाकरे यांची एकांतात बंद दरवाजाआड बैठक झाली आहे. त्यावेळी दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असतांनाही बैठकीला उपस्थित नव्हते. यापूर्वी २०१९च्या निवडणुकीतील वाटाघाटी करण्यासाठी उध्दव ठाकरे व अमित शहा यांचीही दरवाजाआड बैठक झाली होती. त्याची आठवण राज-शहा भेटीने आली आहे.

राष्ट्रवादीतील नेते अजित पवार हे महायुतीत आले असले तरी त्यांना पवार कुटुंबीयांशी संघर्ष करावा लागत आहे. शरद पवारांबरोबर त्यांचे नातू आमदार रोहित पवारही असून काल-परवा तर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हेही शरद पवारांच्या गटात सामील झाले आहेत. याचा अर्थ अजित पवारांना पवार कुटुंबीयांत वेगळे पाडण्याचे राजकारण केले जात आहे. शरद पवारांनी ‘मराठा’ आंदोलनाचे नेते स्व.विनायक मेटे यांच्या पत्नीस रणांगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महादेव जानकरांनी यापूर्वी शरद पवार यांच्या विरोधात जेवढी टीका केली होती तेवढी अन्य कोणीही केली नव्हती ते जानकर आज शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओकच्या’ पायऱ्या चढत आहेत. आतापर्यंत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या दोन बहीण-भावामध्ये विस्तव ही जात नव्हता.आता ते दोघे महायुतीतील राजकारणामुळे एकत्र आले आहेत.

२०१९च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या व पुढे राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पाठिंब्याने खासदार झालेल्या नवनीत राणा आता भाजपाच्या तंबूत आल्याचे दिसते. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यास तत्वतः सर्वच घटक पक्षांचा विरोध होता. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न हा १९९८ पासून प्रलंबित आहे. त्यावेळी राज्यामध्ये भाजपा-सेना युतीचे राज्य होते. भाजपाचे जेष्ठ नेते अण्णा डांगे यांनी त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पंढरपूर येथे आणून एक मेळावा घेतला. मात्र आता तेच डांगे भाजपा मध्ये राहिले नाहीत. महाराष्ट्रात धनगरांची मते ही मोठया प्रमाणात असून जानकरांमुळे ही मते शरद पवारांच्या पारडयात जाऊ शकतात अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही महायुतीकडे पंढरपूर व परभणी या लोकसभेच्या जागा मागत आहेत. पंढरपूर मध्ये शिवसेना उबाठाने वाकचौरे हे उमेदवार दिले असून भाजपाने पंढरपूर मधील उमेदवाराचे नाव अजून जाहीर केले नाही. त्यामुळे पंढरपूरची एक जागा आठवले यांना सोडली जाईल अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या अजितदादांनी बंड करून भाजपबरोबर सोयरिक केली आहे तर शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भाषेत बोलायचे तर भाजपने यापूर्वी शिवसेना व धनुष्यबाण चोरले, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांना पळवले आहे. भाजपने महाराष्ट्रात एनडीएला ४८ चे गणित पूर्ण करण्यासाठी राज ठाकरेंना आपल्या तंबूत घेतले आहे. आता पाहूया गणितातील बेरीज कोण जिंकते ते!

logo
marathi.freepressjournal.in