"...तर त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल", शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "मोदी सरकारला देशाचे चित्र काही अनुकुल दिसत नाही, त्यामुळे मी..."
"...तर त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल", शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देखील मी पुन्हा येईन.. असा विश्वास व्यक्त केला. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईत होणाऱ्या इंडिया बैठकीबाबतही माहिती दिली. पंतप्रधान मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "मोदी सरकारला देशाचे चित्र काही अनुकुल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईन असं कितीही सांगितलं तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल."

यावेळी बोलताना पवारांनी मणिपूर मुद्याला देखील हात घातला. मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी या देशाच्या दृष्टीने घातक आहेत. गेल्या ९० दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर २ मिनिटं बोलले. तर इतर विषयांवर २ तास बोलले. मणिपूरमध्ये जाऊन तेथील लोकांना विश्वास द्यावा, हे त्यांना वाटलं नाही. त्यांनी निवडणुकीच्या तयारीची मीटिंग घेणं महत्वाचं वाटलं. मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार पाहतेय. म्हणून जनमत मोदी सरकार विरोधात करायची इंडियाची भूमिका आहे. असं पवार म्हणाले.

दिल्लीतील भाषणात त्यांनी मणिपूर घटनेवर बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल म्हणाले. फडणवीस आले मात्र कसे? त्यामुळे आता हे कसे येतात ते बघावं लागेल. असो, आम्ही संघर्ष करु आणि मजबुतीने उभं राहू. जनमत तयार करुन यांना धडा शिकवू, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मी राज्यात फिरतोय, लोकांचं समर्थन मिळत असून लोक पाठिंबा देत आहेत. सांगोल्यात हजारो लोकांनी माझी गाडी अडवली. अनेक ठिकाणी लोकं पुढे येवून समर्थन देत आहेत. आनंद आहे.... बीडच्या सभेनंतर काही दिवसानंतर पुन्हा बाहेर पडणार आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in