शिवसेनेचा आज वर्धापनदिन; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५८ वा वर्धापनदिन बुधवारी साजरा करण्यात येणार आहे.
शिवसेनेचा आज वर्धापनदिन; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष
Published on

प्रतिनिधी/मुंबई : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५८ वा वर्धापनदिन बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वर्धापनदिनी शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. भाजप तसेच शिंदे गट यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापन केली. शिवसेना पक्ष हा आता ५८ वर्षांचा झाला असून बुधवारी षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा हा दुसरा वर्धापनदिन आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि चिन्ह नसतानाही ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांचा उत्साह दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा देखील महाविकास आघाडी एकत्रितच लढविणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्धापनदिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदे गटावर काय तोफ डागणार हे पहावे लागणार आहे.

वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार त्यासाठी पक्षातील सर्व नेतेमंडळी, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत विजयी पताका फडकावणाऱ्या ९ नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला जाणार आहे. स्थापना दिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेलाही सुरुवात केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in