
उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील लढती अखेर सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाल्या आहेत. महायुतीचे उमेदवार महेश बालदी, शिवसेना (उबाठा) माजी आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या शेकापचे प्रितम म्हात्रे आणि शिवसेना (उबाठा) मनोहर भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शेवटच्या दिवशी या दोघांपैकी एकजण उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती. मात्र प्रितम म्हात्रे यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात आता १४ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. विद्यमान आमदार महेश बालदी हे भाजपतर्फे, माजी आमदार मनोहर गजानन भोईर हे शिवसेना उबाठा गटाकडून, प्रितम जनार्दन म्हात्रे हे शेकापकडून, सत्यवान भगत हे मनसेतर्फे, महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी), कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक), सुनिल मारूती गायकवाड (बसपा), मनोहर परशुराम भोईर (अपक्ष), प्रितम धनाजी म्हात्रे (अपक्ष), प्रितम बळीराम म्हात्रे (अपक्ष), बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष), निलम मधुकर कडू (अपक्ष), श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष) आणि कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे. शेवटच्या दिवशी संतोष हिराजी ठाकूर (अपक्ष) आणि जितेंद्र दामोदर म्हात्रे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.