ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, खासदार नरेश म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला (उबाठा) ९ जागा व शिंदेंच्या शिवसेनाला ७ जागा मिळाल्या. केंद्रात सत्ताधारी भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने एकेक खासदार आता त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, खासदार नरेश म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला (उबाठा) ९ जागा व शिंदेंच्या शिवसेनाला ७ जागा मिळाल्या. केंद्रात सत्ताधारी भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने एकेक खासदार आता त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. निवडणूक होऊन अवघे चार दिवस झाल्यानंतर शिवसेनेचे (उबाठा) दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, शिवसेना (उबाठा) गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला आमच्या मतदारसंघात कामे करायची आहेत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देतो, असे त्यांनी सांगितले. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मते मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले, असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.

मुख्यमंत्र्यांशी केला संपर्क

ठाकरे गटातून निवडून आलेल्या दोन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत आल्यास पक्षांतर बंदी कायद्यामुळे अपात्र ठरण्याची भीती आहे. त्यामुळे शिवसेनेचे (उबाठा) नऊ खासदार शिंदे गटात येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेचा निकष लागू शकणार नाही. आणखी सहा जणांची गरज आहे. अपात्रतेवर मार्ग काढण्याची गरज आहे, असे म्हस्के म्हणाले.

त्या खासदारांची नावे जाहीर करा - सुषमा अंधारे

म्हस्के यांच्या वक्तव्याला शिवसेना नेत्या (उबाठा) सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमचे दोन खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी त्यांची नावे जाहीर करावीत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असे खासदार माणसाला हे शोभत नाही. कदाचित नरेश म्हस्के यांनाच आपण खासदार झालो, यावर विश्वास बसत नसेल. पैशांच्या जोरावर खासदारकी विकत घेतली त्याच्याकडून गांभीर्याने बोलण्याची अपेक्षा नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in