उद्धव ठाकरे विरोधी पक्षांच्या बैठकीला ; भाजपने करुन दिली बाळासाहेबांच्या 'त्या' वाक्याची आठवण

या बैठकीला महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती
उद्धव ठाकरे विरोधी पक्षांच्या बैठकीला ; भाजपने करुन दिली बाळासाहेबांच्या 'त्या' वाक्याची आठवण

आज बिहारमध्ये देशातील १५ विरोधी पक्षाची बैठक सुरु आहे. यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरु आहे. तसंच रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. भाजपने मात्र या बैठकीवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब म्हणायचे की, शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही. काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागेल त्यावेळी मी दुकान बंद करेन, आज उद्धव ठाकरे पाटण्याला पोहचले आहेत. त्यामुळे बाळासाहेब विचार करत असतील की, दुसरे कोणी नाही तर माझ्या मुलानेच माझे दुकान बंद केले. अशी टीका नड्डा यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आजच्या बैठकीवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व घराणेशाही पक्ष आपापल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी युती करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी २०१९ च्या निवडणूकीची आठवण करुन देत त्यावेळी देखील असाच प्रयत्न झाला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं सांगितलं. आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीला जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची देखील उपस्थिती होती. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला रोज टोमणा मारणारे उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्तीसोबत गेले, हे पाहून मला आश्चर्य वाटते. ते आता स्व:ता मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसून युतीबाबत बोलत आहेत. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून बिहारचे मुख्यंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सारेन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची या बैठकीला उपस्थिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in