हिंमत असेल तर महापालिका, विधानसभा एकत्र महिन्यात निवडणुका घ्या ; उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान

त्यांच्या आयुष्यातील शेवटचीच निवडणूक असेल तर आम्ही आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखे लढणार असल्याचेही ते म्हणाले
हिंमत असेल तर महापालिका, विधानसभा एकत्र महिन्यात निवडणुका घ्या ; उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान
Published on

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मिंधे सेना, त्यांचे चेलेचपाटे आणि मुन्नाभाईला सोबत घेऊन सगळे तुटून पडणार आहेत. त्यांना शिवसेना, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब संपवायचे आहे; पण खरे तर मी याच संधीची वाट पाहत होतो. अमित शहांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एका महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक घेऊन दाखवावी. आणखीन हिंमत असेल तर सोबत विधानसभेचीही निवडणूक घेऊन दाखवावी. शिवसेनेला जमिन दाखवायची भाषा करणाऱ्यांना नाही अस्मान दाखविले तर पहा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. देवेंद्र फडणवीस म्हणताहेत त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असल्यासारखे ते लढणार आहेत. होय ही त्यांच्या आयुष्यातील शेवटचीच निवडणूक असेल तर आम्ही आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखे लढणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचेही त्यांनी ठणकावले.

शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गट यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईसाठी शिवसेनेने सत्तेत असताना काय केले तसेच शिवसैनिकांनी मुंबईकरांसाठी प्राणांचेही बलिदान दिल्याचे दाखलेही त्यांनी दिले. मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मिंधे सेना, मुन्नाभाईला सोबत घेउन सगळे आता तुटून पडणार आहेत. त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबिय संपवायचे आहे. पण शिवसेना ही काही रस्त्यावर पडलेली झुरळ किंवा ढेकूण नाही की कोणीही येउन चिरडायला. अमित शहा शिवसेनेला जमिन दाखवायची भाषा करतात. पण या जमिनीतल्या गवतालाही तलवारीची पाती फुटतात. आम्हीच त्यांना अस्मान दाखवू असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बाप पळवणारी टोळी

आतापर्यंत मी मुले पळवणारी टोळी बघितली होती. पण आता बाप पळविणारी टोळी फिरत असल्याची टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे यांना आम्ही दूध पाजले. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत. मुंबईचे लचके तोडण्यासाठी आता गिधाडे फिरायला लागली आहेत. मुंबई तुमच्यासाठी चौरसफुटाची जमिन असेल. पण आमच्यासाठी ती मुंबा आई आहे,आमची मात़भूमी आहे. आमच्या आईवर जो वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुंबई आणि या कमळाबाईचा संबंधच काय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे आजोबा प्रबोधनकार हे अग्रणी होते. तेव्हा याच जनसंघाने मराठी माणसाची एकजूट फोडली होती. ही त्यांचीच अवलाद आहे. भाजपासोबतच्या युतीत आमची २५ वर्षे सडली याचा पुनरूच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला.

वेदांत परत आणण्यासाठी मी सोबत येतो

आमच्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन गेला हे धादांत खोटे आहे. गुजरातला गेलेला वेदांत परत आणण्यासाठी चला मी तुमच्यासोबत येतो. एकत्र प्रयत्न करूया असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. पण धारावीत होणारे आर्थिक केंद्रही गुजरातला पळविले. धारावीतल्या रहिवाशांना घर तर निश्चितच मिळाले पाहिजे पण रोजगारासाठी आर्थिक केंद्रही परत आले पाहिजे. एक-एक उदयोग राज्यातून बाहेर जात आहे. पण मिंधे गट हा शेळया शेपटया घालून दिल्लीसमोर मुजरे करत आहे. आता वेदांत गुजरातला गेल्यानंतर केंद्राने लगेचच सवलती दिल्या आहेत. म्हणजे यांचे आधीच ठरले होते. मिंधेगटात हिंमत असेल तर हे पंतप्रधानांना सांगावे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी त्यावेळी रूग्णालये, कोविड सेंटर उघडत होतो

भाजपा आता जाहिराती करते आहे की आमचे सरकार आले आणि हिंदू सणांवरील विघ्न टळले. कोरोनाच्या काळात देखील यांनी प्रार्थनास्थळे उघडा अशी मागणी केली होती. मात्र मी तेव्हा लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोविड सेंटर उघडत होतो. आता देखील सगळी बंधने मी हटविली होती. पंढरीची वारी देखील यावर्षी निर्बंधाविनाच साजरी झाली ना असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रासाठी ज्या पायाभूत सुविधा आम्ही निर्माण केल्या त्या संपूर्ण देशात कोणी निर्माण केल्या ते दाखवा असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in