
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली. यावर राजकीय वर्तूळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद उमटले. अशात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज ते विधान भवनात आले होते. यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी असले किळसवाणे आणि बीभत्स व्हिडिओ कधीही बघत नाही. परंतु त्यावर काल जनतेने आणि खास करुन राज्यातल्या माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या भावनांची कदर सरकारने कदर केली पाहीजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओचा विषय संपवला.
काय नेमकं प्रकरण?
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं. या प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली. विधिमंडळात देखील हे प्रकरण चांगलचं गाजलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचं सांगत व्हिडिओमागची सत्यता तपासून पाहण्याची विनंती केली. विरोधकांनी विधिमंडळात हा विषय उचलून धरल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.