

नागपूर : अल्पसंख्यांकांच्या वोट बँकसाठी हिंदुत्व सोडले तसेच हिंदुत्वाच्या प्रश्नावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले होते. त्याला चोख प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही. एखाद्या राष्ट्रांत राष्ट्रगीतावरून चर्चा होते. भाजपचे ‘वंदे मातरम’ हे ‘वन डे मातरम’ आहे. कारण त्यांना याची काही पडलेली नाही. भारतात काय सुरू आहे? वंदे मातरम म्हणताना त्यांना भारत माता किती दुःखात आहे हे त्यांना दिसत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी चढवला.
विधान भवन परिसरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमित शहा यांचा व्हिड[ओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. ‘कोण होतास तू, काय झालास तू,’ असे ट्विट फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी त्यांना म्हणू इच्छितो की, कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू. मुख्यमंत्र्यांनी आता नवीन खाते बनवावे आणि त्याचे नाव पांघरूण खाते ठेवावे. म्हणजे बाकीचे मंत्री पांघरूण पाहून हात-पाय पसरतील. मला मुख्यमंत्र्यांची दया येते. एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी जवळ घेतले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.”
शहा यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. “अमित शहा खूप हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. संघांनी तर मला शिकवूच नये. वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय. माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघावं,” अशा शब्दांत ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली.
“काही दिवसांपूर्वी दिल्लीत संघाच्या कार्यालयासाठी मंदिर पाडण्यात आले आहे. ही बातमी चालली, पण आता अमित शहा यांना विचारतो की, मंदिर पाडून तुम्ही तिथे संघाचे कार्यालय उभारताय? मी मुख्यमंत्री असताना पालघरचे साधू हत्याकांड घडले होते. त्या साधू हत्याकांडातील संबंधित व्यक्तीला भाजपात घेताना तुमचे हिंदुत्व संपले होते का, असा सवाल ठाकरेंनी केला.
गोमांस खाणाऱ्या रिजिजूंना मंत्रिमंडळातून हाकला
“अमित शहा जर माझ्यावर हिंदुत्वावरून टीका करत असतील, तर त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. ते सांगतात मी गोमांस खातो, मला कोण अडवतं ते बघतो. एवढंच नाही तर ९ डिसेंबरच्या फोटोत किरेन रिजिजू हे अमित शहा यांच्यासोबत एकत्र जेवण करत आहेत. आता रिजिजूंच्या थाळीत काय आहे? हा प्रश्न आहे. जर हिंमत असेल आणि अमित शहा यांना माझ्या हिंदुत्वावर त्यांना शंका असेल तर आधी रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढले पाहिजे,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
मुंबई लुटणाऱ्यांनी शहांविरोधात बोलू नये - शिंदे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्याबाबत असे वक्तव्य दुर्दैवी आहे. ज्यांनी अनेक वर्षे मुंबई लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड काळात रुग्णांची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, अशा लोकांनी अमित शहा यांच्याबाबत बोलणे ही शोकांतिका आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.