खोक्यात बंद झालेल्यांना परत बाहेर काढणार नाही,उद्धव ठाकरे यांचा इशारा

खोक्यात बंद झालेल्यांना परत बाहेर काढणार नाही,उद्धव ठाकरे यांचा इशारा

खोक्यात बंद झालेल्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नसल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटास लगावला आहे.

मुंबई : भटकंती करायला काही लोक बाहेर गेले आहेत. त्यांना परत घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नसल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटास लगावला आहे. येत्या १० तारखेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्षांचा निर्णय येणार आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अटकळी राजकीय वर्तुळात चर्चिण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला महत्व आहे. तसेच येत्या २२ तारखेला आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार असून २३ तारखेला नाशिकमध्ये मेळाव्यास संबोधित करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचसोबत १३ तारखेला खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात शाखांना भेटी देणार असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटात रविवारी पक्षप्रवेश झाले. त्यावेळी मातोश्री येथे जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते. भटकंती करायला काही जण बाहेर गेले आहेत. खोक्यात बंद झालेल्यांना आता खोक्याच्या बाहेर काढण्याची गरज नसल्याचे सांगून उदधव ठाकरे म्हणाले, खोके घेणा-यांनी पक्ष, चिन्ह सर्व घेतले तरी त्यांना उद्धव ठाकरेच दिसतो. पण, उद्धव ठाकरे एकटा नाही. माझ्यासोबत आज संपूर्ण महाराष्ट्र आहे. शिवसैनिकांचे प्रेम माझ्यासोबत आहे. लढाई सोपी नाही. पण, आज हे सर्व कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, त्यामुळे लढाई सोपी होणार असल्याचे ते म्हणाले. आपल्यासोबत शिवसैनिकांची माया, प्रेम, जिद्द आहे. येत्या २३ तारखेला आपण नाशिकमध्ये मेळावा घेणार आहोत. त्याआधी २२ तारखेला आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहोत. राममंदिराचे उद‌्घाटन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. कारसेवकांचे रक्त त्यासाठी सांडले आहे. शिवसेनाप्रमुख तसेच शिवसैनिकांनी त्यासाठी खूप भोगले आहे. विशेष कायदा करावा, अशी आमची अपेक्षा होती पण शेवटी न्यायालयाच्या आदेशाने राममंदिराचा मार्ग प्रशस्त झाल्याचेही ते म्हणाले. येत्या १३ तारखेला आपण कल्याण मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कल्याण मतदारसंघातील शाखा-शाखांना भेटी देणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

किरण माने शिवसेनेत

राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे अभिनेते किरण माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेले असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे एक संवेदनशील अभिनेता म्हणून मी सोबत येण्याचा निर्णय घेतला असल्याचे किरण माने म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in