एनडीएच्या नेतेपदी मोदींची एकमताने निवड

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआच्या (एनडीए) नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून एकमताने निवड केली. देशातील गरीब, महिला, युवक, शेतकरी आणि वंचित घटकांचा उद्धार करण्यासाठी सरकार बांधील असल्याचे अधोरेखित करणारा ठरावही यावेळी मंजूर करण्यातआला.
एनडीएच्या नेतेपदी मोदींची एकमताने निवड
ANI/X

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआच्या (एनडीए) नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून एकमताने निवड केली. देशातील गरीब, महिला, युवक, शेतकरी आणि वंचित घटकांचा उद्धार करण्यासाठी सरकार बांधील असल्याचे अधोरेखित करणारा ठरावही यावेळी मंजूर करण्यातआला.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मोदींचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मार्ग या बैठकीत मोकळा झाला. या बैठकीला तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, एलजेपीचे (आर) नेते चिराग पासवान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

देशाच्या वारशाचे संवर्धन करतानाच एनडीए सरकार देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या राहणीमानाच्या दर्जात कशी सुधारणा होईल यासाठी सातत्याने काम करीत राहील, असे ठरावात म्हटले आहे.

एनडीएने २०२४ची लोकसभा निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढली आणि जिंकली याचा आपल्याला अभिमान आहे. आपण सर्व जण एकमताने मोदी यांची नेते म्हणून निवड करीत आहोत, असेही ठरावात म्हटले आहे.

एनडीए खासदारांची ७ जूनला बैठक

एनडीएच्या खासदारांची ७ जून रोजी बैठक होणार असून त्यामध्ये मोदी यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड केली जाणार आहे, त्यानंतर एनडीएचे नेते आपल्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राष्ट्रपतींकडे जाणार आहेत, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बैठकीनंतर सांगितले. प्रत्येक पक्षातील किती जणांना मंत्रीपदे मिळणार यासह अन्य अटींवर जेवढी लवकर चर्चा होईल, तेवढ्या लवकर शपथविधीचा दिवस ठरणार आहे. तर या आठवडा अखेरीला शपथविधी होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.

१७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मोदींनी राष्ट्रपती मुर्मू यांना लोकसभा विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस केली. विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे.

रालोआच्या बैठकीला अजितदादा अनुपस्थित

दिल्लीत पार पडलेल्या रालोआच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले आहेत. त्यांच्या ऐवजी प्रफुल पटेल आणि नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. रालोआच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. रालोआने सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या आधी सर्व घटकपक्षांची दिल्लीत बैठक बोलाविली होती. लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून अजित पवार नाराज आहेत. त्यांच्या पक्षाचे एकमेव सुनिल तटकरे हे निवडून आले आहेत. बारामतीमधील निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना तिथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुरूवारी अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे.

मोदींचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मूंनी स्वीकारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. मुर्मू यांनी मोदी यांचा राजीमामा स्वीकारला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना कारभार पाहण्यास सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी मुर्मू यांची भेट घेऊन राजीनामा दिला. मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारून मोदी यांना नवे सरकार स्थापन होईपर्यंत कारभार पाहण्यास सांगितले आहे, असे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यामध्ये सत्तारूढ एनडीएला बहुमत मिळाले आहे, मात्र भाजपला २४० जागाच जिंकता आल्याने त्यांना २०१४ पासून प्रथमच जादुई संख्या गाठता आली नाही. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in