भाजपच्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार;महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी!

निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणीव झाल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत.
भाजपच्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार;महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी!

मुंबई : निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणीव झाल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात मतांचे ध्रुवीकरण घडवण्याच्या अजेंड्याचे प्रतीक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणीव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर ‘तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात की पाकिस्तानात?’ अशी जाहिरात भाजपने दिली आहे. हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाला भारत आणि पाकिस्तानमधला फरक कळत नाही का?

पंतप्रधान मोदी हे हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. १० वर्षांत जनतेच्या हिताचे काही केले नाही. त्यामुळे मते मागण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा आधार घ्यावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणारा, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ला पठाणकोट येथे बोलावणारा पंतप्रधान पाहिजे की, चीनसमोर निधड्या छातीने उभा राहणारा, मणिपूरमध्ये जाऊन पीडितांचे सांत्वन करणारा, कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी ‘भारत जोडो’ यात्रा काढणारा पंतप्रधान पाहिजे, अशी जाहिरात आम्हीही देऊ शकतो, पण आमच्याकडे कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता नाही, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या मित्रपक्षांवरही कारवाई करण्याची मागणी

भारताच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. देशातील विविध राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत नाहीत, मग देशातील जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी भारतातलाच एक पक्ष विजयी होणार आहे. भारताचे सरकार बनणार आहे. याच्याशी पाकिस्तानचा संबंध काय? पण भाजप आणि पंतप्रधान वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असून, हा ‘आदर्श आचारसंहिते’चा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे व भाजपसोबत ही जाहिरात देणारे त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in