आम्ही मोदी सरकार कधीही पाडू शकतो,संजय राऊत यांचा दावा

देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना झिडकारले आहे. त्यांच्या संविधानविरोधी झुंडशाहीचा पराभव केला आहे.
आम्ही मोदी सरकार कधीही पाडू शकतो,संजय राऊत यांचा दावा

प्रतिनिधी / मुंबई : देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना झिडकारले आहे. त्यांच्या संविधानविरोधी झुंडशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाचीही त्याच पद्धतीने निवड झाली पाहिजे. उपाध्यक्षपदही पारदर्शक पद्धतीने घटनेने विरोधी पक्षाला मिळाले पाहिजे. मोदी सरकार हे टेकूवर बसले आहे, ते कधीही पडू शकते. राहुल गांधी आणि आम्ही कधीही सरकार पाडू शकतो, असा दावा ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदावर रालोआतील घटक पक्षाच्या व्यक्तीची निवड न झाल्यास नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांचे पक्ष फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षांनी मागितले आहे. चंद्राबाबू नायडू यांचे नाव त्यासाठी चर्चेत आहे. लोकसभेचे अध्यक्षपद जर रालोआतील घटक पक्षांना मिळाले नाही तर मोदी आणि शहा हे चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्या पक्षाच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकसभेचे अध्यक्षपद हे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रात देखील विधानसभेत आपण त्याचे महत्त्व पाहिले आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयानेही शिंदे गटाचा व्हीप बनावट असल्याचे सांगितले आहे. शिंदे यांची निवडही बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तरीही नार्वेकर यांनी घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो, असे राऊत म्हणाले.

देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांचा पराभव केला आहे. संविधानविरोधी झुंडशाहीला झिडकारले आहे. नरेंद्र मोदींचा आता ताम झाम राहिलेला नाही. त्यामुळे संसदेतील उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला मिळाले पाहिजे. पारदर्शक पद्धतीने त्याची निवड झाली पाहिजे. मोदी सरकार हे टेकूवर बसले आहे. तो टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही ठरविले तर हे सरकार कधीही पाडू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in