"कोणी जावो न जावो, मी नक्की जाणार", अयोध्येला जाण्याबाबत हरभजन सिंग यांचं स्पष्ट मत

मंदिर समितीने देशभरातील दिग्गज राजकारणी, अभिनेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. तसेच, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनादेखील या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
"कोणी जावो न जावो, मी नक्की  जाणार", अयोध्येला जाण्याबाबत हरभजन सिंग यांचं स्पष्ट मत

अयोध्येत होणारा राम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मंदिर समितीने देशभरातील दिग्गज राजकारणी, अभिनेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. तसेच, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनादेखील या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काँग्रेसने मात्र, या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर "कोणी जावो न जोवो, माझी देवावर श्रद्धा आहे. मी जाणार आहे", अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग यांनी एएनआयशी बोलताना दिली.

"कोण काय म्हणते ही वेगळी गोष्ट आहे. पण, हे मंदिर आमच्या काळात बनत आहे हे आमचे सौभाग्य आहे. आपण तिथे जाऊन आशिर्वाद घेतला पाहिजे. मी हेच सांगले कोणी जावो ना जावो, माझी जी देवावर श्रद्धा आहे, मी नक्की जाणार. ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. कोणता पक्ष जावो ना जावो, काँग्रेसला जायचे असेल जावे, कोणाला माझ्या जाण्याने अडचण असेल तर त्यांना जे करायचे असेल त्यांनी करावे", असे हरभजनसिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. आपल्या देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाची पूजा करतात. धर्म हा आपला खासगी विषय आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करत आहेत. केवळ आगामी निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी हे सगळे केले जात आहे, असा आरोप करत त्यांनी सन्मापूर्वक हे आमंत्रण नाकारले होते. काँग्रेसने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण 22 जानेवारीनंतर सहकुटूंब अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहोत असे सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in