नवी दिल्ली : प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदारांनी मतदान केले याबाबतची माहिती निवडणूक आयोग (ईसी) आपल्या संकेतस्थळावर का अपलोड करीत नाही, असा सवाल राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी गुरुवारी येथे केला. ईसीच्या या भूमिकेमुळे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय राजकीय पक्षांमध्ये बळावत चालला आहे. माहिती अपलोड करण्यात ईसीला काय समस्या आहे, असा सवालही सिब्बल यांनी केला आहे.
मतदानाच्या अखेरीला मतदान प्रतिनिधीकडे अर्ज १७ सीची सविस्तर माहिती देण्यात येते. असे असताना मतदान केंद्रनिहाय किती मतदारांनी मतदान केले याची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात काय समस्या आहे, असे सिब्बल म्हणाले.
मतदान केंद्रनिहाय किती मतदारांनी मतदान केले याची बेसुमार माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली तर निवडणूक यंत्रणेत गदारोळ निर्माण होईल, असे ईसीने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर सिब्बल यांनी वरील सवाल केला आहे. अर्ज १७ सी ही मतदान केंद्रात किती मतदान झाले याची नोंद असते, मात्र ती संकेतस्थळावर अपलोड करण्याचे कायदेशीर अधिकार आम्हाला नाहीत, असे ईसीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे, असे सिब्बल म्हणाले. अर्ज १७ सी निवडणूक अधिकारी स्वाक्षरी करून मतदानाच्या अखेरीस निवडणूक प्रतिनिधीकडे देतो, ही माहिती थेट ईसीकडे पाठविली जाते. असे असताना ईसी संकेतस्थळावर माहिती अपलोड का करीत नाही, काय समस्या आहे, असा सवाल सिब्बल यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला.