सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करणार - अनिल परब

ही सगळी नौटंकी आहे. सोमय्या यांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नाही. मी सोमय्यांविरोधात यापूर्वी अब्रुनुकसानीचा दावा
File Photo
File PhotoANI

दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. मंगळवारी सकाळीच भाजपचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी पोहोचले होते. मात्र, त्यांना परत फिरावे लागले. दरम्यान, सोमय्यांच्या या भूमिकेविरोधात उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल परब आक्रमक झाले आहेत. ‘सोमय्यांकडून माझी बदनामी केली जात आहे. मी या रिसॉर्टचा मालक नाही. त्यामुळे मी सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

“माझा यंत्रणांना विरोध नाही. मी यंत्रणांना सर्व माहिती दिलेली आहे. यंत्रणांनी मला अनेकवेळा बोलावले. प्रत्येकवेळी मी चौकशीसाठी हजर राहिलेलो आहे. अजूनही मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन. कारण या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी माझ्याविरोधात आणखी एक खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात ४२० कलमाचा समावेश करण्यात आला. खोट्या तक्रारी करायच्या, पोलिसांवर, शासकीय यंत्रणांवर दबाव टाकायचा असे केले जात आहे,” असा आरोप परब यांनी केला.

“ही सगळी नौटंकी आहे. सोमय्या यांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नाही. मी सोमय्यांविरोधात यापूर्वी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. मात्र, आता मी फौजदारी दावादेखील दाखल करणार आहे. मी क्रिमिनल रिट पिटिशन फाइल करणार आहे. माझ्याबद्दल बदनामीकारक वक्तव्यं करायची. माझा संबंध नसताना बातम्या द्यायचा, असे केले जात आहे. यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे,” असे अनिल परब म्हणाले.

सोमय्यांचा दापोलीतील साई रिसॉर्टपासून यू-टर्न

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी पुन्हा एकदा दापोलीत दाखल झाले होते. सकाळी दापोली पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर सोमय्या साई रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी दापोलीत गेले खरे, मात्र प्रत्यक्षात त्यांनी दोन्ही हॉटेलवर हातोडा मारलाच नाही. सोमय्या भलामोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी आले होते. त्यामुळे ते रिसॉर्ट पाडणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु, सोमय्यांनी रिसॉर्टच्या बाहेरील काही अंतरावर गाडी पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या टाइल्सवर प्रतिकात्मक हातोडा मारला अन् अवघ्या काही क्षणात ते तिथून निघून गेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in