तेलंगणा : तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) पराभव केला होता. आता काँग्रेसने आपला मोर्चा आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या सर्वेसर्वा वायएस शर्मिला येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ४ जानेवारीला त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात असून आपला पक्षही त्या विलीन करणार आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशात काँग्रेसला बळ मिळणार आहे.
वायएस शर्मिला यांना काँग्रेसकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला यांच्या माध्यमातून आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. रुद्र राजू यांनी शर्मिला लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे म्हटले आहे.
आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची ती बहीण आणि संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची शर्मिला ही मुलगी आहे. २०१२ साली जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत युवाजना श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाची (वायएसआरसीपी) स्थापना केली होती. मात्र, भ्रष्टाचार प्रकरणात जगनमोहन रेड्डींना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली. तुरुंगातून बाहेर आल्यावर जगनमोहन रेड्डी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शर्मिला आणि जगनमोहन यांच्यात मतभेद झाल्यावर शर्मिला यांनी युवाजना श्रमिका रायथू तेलंगणा पक्षाची (वायएसआरटीपी) स्थापना केली.
तेलंगणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. मतविभाजन होऊन भारत राष्ट्र समितीला फायदा होऊ नये म्हणून शर्मिला यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच वायएस शर्मिला यांना पक्षात घेऊन त्यांच्यावर काँग्रेस आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात जगनमोहन विरुद्ध बहीण वायएस शर्मिला सामना रंगणार आहे.