आयपीएलचे १८वे पर्व २१ मार्चपासून सुरू; बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती; २५ मे रोजी अंतिम सामना

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या पर्वाला शुक्रवार, २१ मार्चपासून प्रारंभ होईल.
(डावीकडून) राजीव शुक्ला, रॉजर बिन्नी, श्रेयस अय्यर आणि जय शहा
(डावीकडून) राजीव शुक्ला, रॉजर बिन्नी, श्रेयस अय्यर आणि जय शहा एक्स
Published on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या पर्वाला शुक्रवार, २१ मार्चपासून प्रारंभ होईल. तसेच २५ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले. त्याशिवाय महिलांची आयपीएल (वुमेन्स प्रीमियर लीग) ७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत खेळवण्यात येईल, असे समजते.

बीसीसीआयच्या मुख्य कार्यालयाबाहेर राजीव शुक्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आयपीएलविषयी माहिती दिली. तसेच देवाजित साइकिया यांच्या नावावर बीसीसीआयच्या सचिवपदी यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत जाहीर होईल, असे अपेक्षित आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात आयपीएल प्रशासकीय समितीने पुढील ३ वर्षांसाठी स्पर्धेच्या तात्पुरत्या स्वरुपातील तारखा जाहीर केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी ९ मार्च रोजी संपणार असल्याने त्यानंतर किमान १० ते १२ दिवसांचा अवधी मिळावा, या हेतूने २१ मार्चपासून आयपीएल सुरू करण्यात येईल.

कोलकाता नाईट रायडर्सने २०२४मध्ये आयपीएल जिंकल्याने स्पर्धेचा पहिला तसेच अंतिम सामना ईडन गार्डन्स येथे होईल. गतवर्षी २२ मार्च ते २६ मे या कालावधीत आयपीएल पार पडली होती. गेल्या दोन हंगांमाप्रमाणेच यावेळीही ७४ सामने होतील. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत आयसीसीच्या आदेशानुसार सक्त नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना आयपीएलला हलक्यात घेता येणार नाही.

महिलांच्या आयपीएलसाठी चार शहरे

महिलांची तिसरी आयपीएल ७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुंबई, लखनऊ, बंगळुरू आणि वडोदरा या चार शहरांत खेळवण्यात येईल. याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. तसेच कोणत्या शहरात किती सामने होतील, याविषयीही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. डब्ल्यूपीएलच्या आतापर्यंतच्या दोन हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी जेतेपद मिळवले. या स्पर्धेत मुंबई, बंगळुरू, दिल्ली, गुजरात आणि यूपी असे पाच संघ सहभागी होतात. स्पर्धेचे पहिले पर्व पूर्णपणे मुंबईत, तर दुसरे पर्व दिल्ली आणि बंगळुरू येथे झाले आले होते.

logo
marathi.freepressjournal.in