पैसे लुटण्यासाठी माझ्यावर बलात्काराचा आरोप -वरुण; हॉकीपटूची प्रो लीगमधून माघार आणि न्यायालयात धाव

भारताचा हॉकीपटू वरुण कुमारने आगामी प्रो लीग हॉकीमधून माघार घेतली आहे
पैसे लुटण्यासाठी माझ्यावर बलात्काराचा आरोप -वरुण; हॉकीपटूची प्रो लीगमधून माघार आणि न्यायालयात धाव

नवी दिल्ली : भारताचा हॉकीपटू वरुण कुमारने आगामी प्रो लीग हॉकीमधून माघार घेतली आहे. आपल्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप खोटा असून पैसे लुटण्याच्या कारणास्तव ती मुलगी असे कृत्य करत आहे, अशी प्रतिक्रिया वरुणने व्यक्त केली आहे. तसेच याविरोधात दाद मागण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे.

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचा सदस्य असलेल्या २८ वर्षीय वरुणवर काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला. २०१८मध्ये ती अल्पवयीन असतानाही वरुणने तिच्याशी लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडिता म्हणाली. वरुणचा लवकरच सुरू होणाऱ्या प्रो लीग हॉकीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र या प्रकरणामुळे त्याला त्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

“गेल्या दोन दिवसांपासून माझे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. अशा स्थितीत मी देशासाठी १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले असून माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. तसेच माझ्याकडून पैसे लुटण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहे,” असे वरुण म्हणाला. भारतीय हॉकी महासंघाने वरुणला माघारी परतण्याची अनुमती दिली आहे.

वरुणला २०२१मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच २०२३मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in