अर्जुनच्या ऐतिहासिक प्रवासाला ब्रेक; उपांत्य फेरीत अमेरिकेच्या अरोनियनविरुद्ध पराभूत

भारताचा ग्रँडमास्टर -अर्जुन इरिगेसीचा फ्री स्टाईल ग्रँडस्लॅम स्पर्धेतील ऐतिहासिक प्रवास शनिवारी उपांत्य फेरीत थांबला. अमेरिकन बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनने अर्जुनला ०-२ असे पराभूत केले. त्यामुळे स्पर्धेतील अर्जुनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
अर्जुनच्या ऐतिहासिक प्रवासाला ब्रेक; उपांत्य फेरीत अमेरिकेच्या अरोनियनविरुद्ध पराभूत
Published on

लास वेगास : भारताचा ग्रँडमास्टर -अर्जुन इरिगेसीचा फ्री स्टाईल ग्रँडस्लॅम स्पर्धेतील ऐतिहासिक प्रवास शनिवारी उपांत्य फेरीत थांबला. अमेरिकन बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनने अर्जुनला ०-२ असे पराभूत केले. त्यामुळे स्पर्धेतील अर्जुनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

अर्जुन इरिगेसी याने आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर फ्री -स्टाईल ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऐतिहासिक धडक मारली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू आहे. मात्र लेव्हॉन अरोनियन विरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत अर्जुनची जादू चालली नाही आणि त्याला पराभव पत्करावा लागला.

'प्ले ऑफ'च्या लढतीत जगविख्यात बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर अर्जुनने उपांत्यपूर्व फेरीत हिकारू नाकामुराला धूळ चारली. त्यामुळे भारताचा हा खेळाडू प्रकाशझोतात आला. मात्र त्यानंतर शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या गेममध्ये संधी मिळूनही त्याचा फायदा अर्जुनला उचलता आला नाही. अरोनियनने कठीण परिस्थितीत आपला खेळ उंचावत अर्जुनला पराभवाचा चेहरा दाखवला.

दुसऱ्या डावात अरोनियनला पुढे जाण्यासाठी बरोबरीची गरज होती. त्याने सुरुवातीला चांगला खेळ करून डाव समसमान स्थितीत नेला. दुसरीकडे विजयाची गरज असलेल्या अर्जुनने अधिक धोके पत्करले. मात्र त्याचा तोटा अर्जुनला झाला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने उझबेकिस्तानच्या जावोखीर सिंदारोववर १.५-०.५ अशी मात केली. अन्य लढतीत, अमेरिकेच्या वेस्ली सो याने उझबेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसत्तोरोवला ३-१ ने नमविले. हिकारू नाकामुराने लेनियर डोमिंग्वेझ पेरेझला २-० असे हरवले.

बुद्धिबळातील माजी जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि जर्मनीचे विख्यात उद्योजक जॅन हेन्रिक यांनी एकत्रितपणे या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकंदर १६ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत आजवर भारताचा एकही स्पर्धक उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेला नव्हता. मात्र २१ वर्षीय अर्जुनने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत हा ऐतिहासिक पराक्रम करून दाखवला. अर्जुनने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिब्रेक अब्दुसात्रोव्हला १.५-०.५ असे एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. अर्जुनने पहिला जलद गेम सहज जिंकला, तर दुसऱ्या गेममध्ये बरोबरी राखली. अर्जुनकडून अंतिम विजेतेपदक जिंकण्याच्या आशा भारताला होत्या. मात्र शनिवारी अर्जुनच्या ऐतिहासिक प्रवासाला ब्रेक लागला. अमेरिकन बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनविरुद्धच्या -लढतीत अर्जुनचा ०-२ असा पराभव झाला. या पराभवामुळे फ्री स्टाईल ग्रँडस्लॅम स्पर्धेतील अर्जुनचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान अर्जुनच्या पराभवाने स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदला गाशा गुंडाळावा लागला होता. अर्जुनच्या रुपाने भारताच्या आशा जिवंत होत्या.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारतीय बुद्धिबळपटू जागतिक स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत आहेत. डिसेंबरमध्ये डी. गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवली होती. गुकेश सध्या या स्पर्धेत सहभागी झालेला नव्हता.

दरम्यान सध्या सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी, हरिका, वैशाली, दिव्या या चार महिला खेळाडू पदकाच्या स्पर्धेत आहेत. ही महिलांची तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. या स्पर्धेतूनही भारताला विजेतेपदाची आशा आहे.

logo
marathi.freepressjournal.in