सोशल मीडियावर ट्रोल होऊनही खचला नाही अर्शदीप

मैदानावर अशा प्रकारच्या चुका होतात आणि त्या कोणाकडूनही होऊ शकतात. लोकांना बोलण्याची सवय असते
सोशल मीडियावर ट्रोल होऊनही खचला नाही अर्शदीप

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-४ फेरीत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात एक सोपा झेल सोडल्यानंतर माझ्याविषयी करण्यात आलेले सर्व ट्विट्स आणि मेसेज यावर मी हसतोय. या सर्व गोष्टी सकारात्मकपणे घेत आहे. सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर मला आणखी आत्मविश्वास मिळाला असून मी खचलेलो नाही, असे भारताचा युवा जलद गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपल्या वडिलांशी दूरध्वनीवरून सांगितले. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यानंतर चंदिगढमध्ये पोहोचलेले अर्शदीप सिंगचे वडील दर्शन सिंग यांनी इंग्रजी दैनिकाला सांगितले की, “विमानात बसण्याआधी अर्शदीपशी बोलणे झाले. आम्ही पहिला आणि दुसरा सामना पाहिला. मैदानावर अशा प्रकारच्या चुका होतात आणि त्या कोणाकडूनही होऊ शकतात. लोकांना बोलण्याची सवय असते आणि त्यांना बोलू द्यावे. जर लोक यावर बोलत असतील तर त्याचा अर्थ त्यांचे अर्शदीपवर प्रेम आहे.”

अर्शदीपच्या आई-वडिलांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेवर भारताचा संपूर्ण संघ त्याच्या पाठीशी उभा आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-४ फेरीत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात निर्णायक क्षणी एक सोपा झेल सोडल्याबद्दल अर्शदीपला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याला खलिस्तानी समर्थक संबोधले गेले. विकीपिडियावरील त्याच्या पेजवर खलिस्तानी असल्याचे म्हटले गेले. अर्थात, भारत सरकारने त्यावर तातडीने कारवाई करून विकीपिडियाला नोटीस पाठविली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात १८व्या षट्कात अर्शदीपने असीफ अलीचा झेल सोडला होता. असीफने ८ चेंडूत १६ धावा केल्या, त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानचा विजय सुकर झाला.

या घटनेनंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी अर्शदीपला पाठिंबा दिला होता. माजी कर्णधार विराट कोहलीनेदेखील अशा प्रकारच्या चुका सर्वांकडून होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनीदेखील ट्विट करून अर्शदीपला पाठिंबा दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in