BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

महाभियोग प्रस्तावाची कुणकुण लागताच नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी युएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केल्याचे समोर आले आहे. ट्रॉफी लवकरच अधिकृतपणे भारतात पाठवली जाऊ शकते किंवा अबू धाबीतील एखाद्या भारतीय अधिकाऱ्याला ट्रॉफी दिली जाईल, जो नंतर ती भारतात आणेल.
BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट
Published on

‘ट्रॉफी चोरी’च्या कृतीमुळे आणि पदाच्या गैरवापरासह अन्य नियमभंगांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. नक्वी यांना पदावरून हटवण्यासाठी बीसीसीआय महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचारात आहे. महाभियोग प्रस्तावाची कुणकुण लागताच नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी युएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केल्याचे समोर आले आहे.

महाभियोग आणि तक्रारीच्या धमकीनंतर मोहसीन नक्वी वठणीवर -

CNN-News18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या आशिया कपची ट्रॉफी UAE क्रिकेट बोर्डाच्या अबू धाबी येथील मुख्यालयात ठेवण्यात आली आहे. या वृत्तानुसार, ट्रॉफी लवकरच अधिकृतपणे भारतात पाठवली जाऊ शकते किंवा अबू धाबीतील एखाद्या भारतीय अधिकाऱ्याला ट्रॉफी दिली जाईल, जो नंतर ती भारतात आणेल. BCCI ने ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर पदाचा गैरवापर, नियमभंग आणि ‘ट्रॉफी चोरी’चा आरोप करत महाभियोग प्रस्ताव आणण्याची धमकी दिली होती. तसेच, ट्रॉफी चोरी प्रकरणाची अधिकृत तक्रार UAE अधिकाऱ्यांकडे करण्याची योजना आखली होती. त्यानंतर ट्रॉफी UAE क्रिकेट बोर्डाच्या अबू धाबी येथील मुख्यालयात पोहोचवण्यात आली आहे.

एसीसी बैठकीत खडाजंगी

यापूर्वी, मंगळवारी झालेल्या एसीसीच्या ऑनलाइन बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी नक्वींना ट्रॉफी प्रकरणावरून जाब विचारला. “ही ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाची आहे, ती कुणा व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही,” असे दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट सुनावले.

बैठकीच्या सुरुवातीला नक्वी यांनी केवळ नेपाळचा (वेस्ट इंडिजवर विजय) आणि मंगोलियाचा (ACC सदस्यत्व) उल्लेख केला, मात्र भारताच्या विजयानंतरही अभिनंदन केले नाही. त्यावरून शेलार यांनी त्यांना धारेवर धरले, अखेरीस दबावाखाली नक्वींनी भारताचं अभिनंदन केलं.

नक्वी यांनी ट्रॉफीचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत न घेता वेगळ्या वेळी चर्चेला आणावा, अशी भूमिका घेतली. मात्र BCCI ने हे प्रकरण थेट ICC कडे नेण्याचा इशारा दिला असून, नोव्हेंबरमधील ICC बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार आहे. दरम्यान, नक्वी यांनी त्यांच्या कृत्याबद्दल अद्याप औपचारिक माफी मागितलेली नाही. ते पाकिस्तानचे गृहमंत्री आणि PCB चे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या कृतीवर दुहेरी हितसंबंधाचा आरोपही होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in