Women's T20 WC : अंतिम फेरीची हुलकावणी! ऑस्ट्रेलियाला झुंज देऊनही भारताचा पाच धावांनी पराभव

गचाळ (Women's T20 WC) क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांच्या हाराकिरीचा फटका
Women's T20 WC : अंतिम फेरीची हुलकावणी! ऑस्ट्रेलियाला झुंज देऊनही भारताचा पाच धावांनी पराभव

अखेरच्या षटकापर्यंत झुंज देऊनही भारतीय महिला संघाच्या पदरी निराशा पडली. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निर्णायक क्षणी फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि क्षेत्ररक्षणातील गचाळ कामगिरीमुळे भारताला अंतिम फेरीने हुलकावणी दिली. बलाढ्य तसेच गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अवघ्या पाच धावांनी सरशी साधून तब्बल सलग सातव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीसाठी साहजिकच पाच वेळा टी-२० विश्वचषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात होते. परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील झुंजार रणरागिणींनी कांगारूंना कडवी झुंज दिली. आजारातून सावरत मैदानावर उतरणाऱ्या हरमनप्रीतने स्वत: ३४ चेंडूंत ५२ धावा फटकावून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र ती धावचीत झाली आणि भारताच्या आशांना सुरुंग लागला. १८ चेंडूंत ३१ धावा फटकावण्यासह दोन बळी मिळवणारी अॅश्ले गार्डनर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर बेथ मूनी (३७ चेंडूंत ५४) आणि कर्णधार मेग लॅनिंग (३४ चेंडूंत नाबाद ४९) यांनी ऑस्ट्रेलियाकडून दमदार खेळी साकारली. एकवेळ १० षटकांत १ बाद ६९ अशी स्थिती असतानाही ऑस्ट्रेलियाने अखेरच्या १० षटकांत १०३ धावा कुटल्या. भारताकडून शिखा पांडेने दोन, तर दीप्ती शर्मा, राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने स्मृती मानधना (२), शफाली वर्मा (९) आणि यास्तिका भाटिया (४) यांना पहिल्या तीन षटकांतच गमावले. ३ बाद २८ धावांवरून जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत यांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची मोलाची भागीदारी रचली. जेमिमा २४ चेंडूंत ४३ धावांवर बाद झाल्यावरही हरमनप्रीतने झुंज दिली. मात्र अर्धशतकाची वेस ओलांडल्यावर दुहेरी धाव घेताना बॅट अडकल्याने ती धावचीत झाली. त्यानंतर स्नेह राणा (११), दीप्ती (नाबाद २०) यांना विजय साकारता आला नाही. अखेरच्या ६ चेंडूंत १६ धावांची आवश्यकता असताना भारताने १० धावा केल्या.

असा निसटला सामना

* गचाळ क्षेत्ररक्षणामुळे किमान १० धावा अतिरिक्त.

* लॅनिंग आणि मूनी यांना अनुक्रमे १ आणि ३२ धावांवर जीवदान.

* आघाडीची फळी तीन षटकांतच माघारी.

* जेमिमा-हरमनप्रीत निर्णायक क्षणी बाद.

पूजा स्पर्धेबाहेर; राणाला संधी

भारताची अष्टपैलू पूजा वस्त्रकारला श्वसनातील अडथळ्यांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीला मुकावे लागले. हरमनप्रीतच्या समावेशावरही प्रश्नचिन्ह कायम होते. ताप आल्याने हरमनप्रीतने बुधवारी सराव करणे टाळले. परंतु गुरुवारी ती मैदानात उतरल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, पूजाच्या जागी अष्टपैलू स्नेह राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in