
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान टी-२० सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्यात बळी ठरलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी हिने या सामन्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने BCCI, क्रिकेटपटू आणि स्पॉन्सर्सवर निशाणा साधत त्यांच्यातील भावना आणि माणुसकी हरवल्याची टीका केली. तसेच, सर्व भारतीयांना हा सामना न पाहण्याचे आवाहन करत, या सामन्यातून पाकिस्तानला मिळणारा पैसा पुन्हा दहशतवादासाठी वापरला जाईल असेही म्हटले आहे.
BCCI च्या कुटुंबातून कोणी मेलं नाही म्हणून...
ऐशन्या द्विवेदी म्हणाली, ''पहिली गोष्ट तर BCCIने हे स्वीकारायलाच नको होतं की पाकिस्तानसोबत इंडिया मॅच खेळेल. हे स्वीकारून आपल्या देशातील लोकं मोठी चूक करत आहेत. पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या २६ लोकांबद्दल BCCI ला कोणतीच भावना नाहीये. हे २६ कुटुंब आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेले जवान या सर्वांचा मृत्यूने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांची शहादत त्यांच्या लेखी काहीच नाहीये. कारण BCCI च्या घरचं कोणी मेलेलं नाही. BCCI मध्ये जेवढे लोकं येतात त्यांच्या कुटुंबामधून कोणी गेलेलं नाही म्हणून कोणी यावर बोलत नाहीये.''
क्रिकेटर कुठे झोपले?
तिने क्रिकेटर आणि स्पॉन्सर्सवर संताप व्यक्त करत म्हंटले, ''दुसरी गोष्ट आपले क्रिकेटर कुठे झोपले आहेत? मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार क्रिकेटला नॅशनल गेम म्हणतात. आपला नॅशनल गेम हॉकी असूनही आपण क्रिकेटला नॅशनल गेम म्हणतो ना? कारण असं बोललं जातं सगळ्यात जास्त भारतीयत्व कोणामध्ये असेल तर ते क्रिकेटर्समध्ये असतं. पण, एक-दोन क्रिकेटर सोडले तर कोणताच क्रिकेटर हे बोलला नाहीये, की आम्हाला भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्कार टाकायचा आहे. आम्हाला पाकिस्तान सोबत खेळायचं नाहीये. BCCI ची टीम थोडी ना तुमच्यावर बंदूक ठेवून गेम खेळवणार आहे.''
हे लोकं मनाने मेलेले आहेत
ऐशन्या पुढे म्हणाली, ''मी सर्व लोकांना, स्पॉन्सर्स, सोनी चॅनल हे दाखवणार आहे; त्यांना विचारू इच्छिते की त्यांच्यात माणूसकी आहे का? २६ लोकांसाठी तुमचं राष्ट्रीयत्व संपलं आहे? स्पॉन्सर तर मिळाले आहेत. सोनी तर मॅच दाखवण्यासाठी तयार झालं आहे. वरुन इतका प्रचार सुरू आहे. तुम्ही तुमच्या देशासाठी काहीच करणार नाही का? तुमच्या सोबत शेजारी जर भांडत असेल तर तुम्ही त्याच्या सोबत बोलत नाही. पण, इथे तर तुमच्या शेजारच्या राष्ट्राने तुमच्या देशातील नागरिकांना 'हिंदू' विचारून मारलं आहे आणि तुम्ही त्यांचं तोंड बघून मॅच खेळणार? तुमच्यामध्ये काही शिल्लक आहे का? हे लोकं मनाने मेलेले आहेत. यांच्या डोळ्यातलं पाणी संपलं आहे. काहीच शिल्लक नाहीये.''
पाकिस्तानचा पैसा दहशतवादाला
पाकिस्तानमध्ये येणाऱ्या पैशांचा वापर पूर्णपणे दहशतवादासाठी वापरला जातो. हे स्पष्ट करत ऐशन्या म्हणाली, ''मी २८ वर्षांची आहे, मला एक गोष्ट समजते जी यांना समजत नाही. या मॅचमधून जो रेवेन्यू येईल त्यातून पाकिस्तान हा पैसा फक्त दहशतवादासाठी वापरणार. कारण, पाकिस्तानमध्ये येणारा १ रुपयाही आंतकवादासाठी जातो. तो देश फक्त आतंकवादी देश आहे. तुमच्या देशात इतक्या वेळा आतंकवादी हमले झाले आहेत, तरी तुम्ही त्या देशासोबत खेळणार? त्याला रेवेन्यू देणार? तुम्ही त्यांना पुन्हा तयार करणार, की परत आमच्या देशात घुसा आणि पुन्हा मारा.''
बहिष्कार टाकण्याची विनंती
शेवटी तिने भारतातील नागरिकांना विनंती केली, की ''मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, नका बघू मॅच. प्रत्यक्षातही बघायला जाऊ नका. मॅचवर त्या दिवशी बहिष्कार टाका. आपली इतकी लहान कृती देशात बदल घडवेल.''