

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ च्या लिलाव यादीत तब्बल ९ नवीन खेळाडूंचा अखेरच्या क्षणी समावेश केला आहे. बीसीसीआयने सुरूवातीला ३५० खेळाडूंची यादी जाहीर केली होती, पण काही वेळातच सुधारित यादी प्रसिद्ध करत अजून ९ खेळाडूंना लिलावात स्थान दिले.
नव्या नावांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधणारा खेळाडू म्हणजे स्वस्तिक चिकारा. तो आयपीएल २०२५ मध्ये विजेतेपद पटकवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा सदस्य होता. यूपी टी२० लीगमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याचे नाव प्रारंभीच्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
५ अनकॅप्ड भारतीय, ३ विदेशी खेळाडूंचा समावेश
सुधारित यादीत आणखी ५ अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत. त्यामध्ये कर्नाटकचा यष्टिरक्षक-फलंदाज के. एल. श्रीजित (मागील हंगामात मुंबई इंडियन्सचा सदस्य होता), त्रिपुराचा मणिशंकर मुरासिंघ, हैदराबादचा चामा मिलिंद, उत्तराखंडचा राहुल राज नमाला, आणि झारखंडचा विराट सिंह यांचा समावेश आहे. यापैकी मिलिंद आणि विराट सिंह यापूर्वीही आयपीएलमध्ये खेळले आहेत.
विदेशी खेळाडूंमध्ये:
ख्रिस ग्रीन (ऑस्ट्रेलिया)
इथन बॉश (दक्षिण आफ्रिका)
विरनदीप सिंह (मलेशिया)
विशेष म्हणजे मलेशियाचा विरनदीप सिंह हा आयपीएल २०२६ लिलावात सहभागी होणारा एकमेव ‘असोसिएट नेशन’चा खेळाडू ठरणार आहे.
इथन बॉशची खास नोंद
इथन हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशचा भाऊ आहे. कॉर्बिनला आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सने कायम ठेवले आहे.
निखिल चौधरीची नागरिकता बदलली
सुधारित यादीतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेग स्पिनर निखिल चौधरीची नागरिकता ‘भारत’वरून ‘ऑस्ट्रेलिया’ अशी बदलण्यात आली आहे. त्याचे नाव आधी स्थानिक खेळाडू म्हणून नोंदवले होते.
वैयक्तिक विनंतीनंतर डी कॉकचेही नाव
विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचे नाव लिलावासाठी सुरुवातीच्या लिस्टमध्येच समाविष्ट करण्यात आले. वृत्तानुसार, एका फ्रँचायझीच्या वैयक्तिक विनंतीनंतर डी कॉकचे नाव जोडण्यात आले.
फक्त ७७ जागांसाठी कोणाचे भाग्य उजळणार?
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या हंगामासाठी १६ डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. पण, या लिलावात फक्त ७७ जागाच १० संघांत मिळून भरायच्या असल्याने कोणत्या खेळाडूचे भाग्य उजळणार, हे पाहणे रंजक ठरेल. आधीच कोलकाताचा आंद्रे रसेल व दिल्लीचा फॅफ डूप्लेसिस यांनी या लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. रसेल कोलकाताचा पॉवर कोच म्हणून दिसेल, तर डूप्लेसिसने वाढते वय व स्पर्धेचा विचार करता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगला प्राधान्य दिले. त्यामुळे लिलावात अधिक रक्कम घेऊन येणाऱ्या संघांकडे खरेदी करण्यासाठी पर्याय कमी झाले आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल व इंग्लंडचा मोईन अली यांनीदेखील माघार घेतली.
आता रसेल, डूप्लेसिस, मॅक्सवेल, मोईन यांसारखे खेळाडू लिलावात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन, श्रीलंकेचा मथीशा पाथिराना, वानिंदू हसरंगा यांच्यासाठीही संघमालक मोठी बोली लावू शकतात. भारतीय खेळाडूंचा विचार करता फक्त वेंकटेश अय्यर व रवी बिश्नोई या दोघांनीच मूळ किंमत (बेस प्राइज) २ कोटी इतकी ठेवली आहे. त्यामुळे या दोघांसाठीही संघमालक मोठी बोली लावतील.
गेल्या महिन्यात सर्व संघांना आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. पंजाबने सर्वाधिक २१, तर मुंबई व गुजरातने प्रत्येकी २० खेळाडू रिटेन केले आहेत. चेन्नई व कोलकाता हे संघ सर्वाधिक रकमेसह ऑक्शनमध्ये येतील. चेन्नईने संजू सॅमसनला संघात आणताना रवींद्र जडेजा व सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले. हा सर्वात मोठा ट्रेड ठरला. २ कोटी मूळ किंमत असलेले एकूण ४० खेळाडू लिलावाचा भाग असतील. ऑस्ट्रेलियाचा ग्रीन, भारताचा सर्फराझ खान, पृथ्वी शॉ, आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हे खेळाडू पहिल्याच सेटमध्ये लिलावात दिसतील.