विश्वविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव! BCCI कडून भारतीय महिला क्रिकेट संघाला ५१ कोटींचे इनाम

विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
विश्वविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव! BCCI कडून भारतीय महिला क्रिकेट संघाला ५१ कोटींचे इनाम
आयसीसी
Published on

मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवत नव्या अध्यायाची नोंद केली. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय संघाने पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकण्याची करामत केली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर आयसीसी विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरणाऱ्या या संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू असून बीसीसीआयनेही त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ५१ कोटींचे इनाम जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर सुरतमधील उद्योगपती आणि राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी महिला खेळाडूंना हिऱ्यांचे दागिने आणि सौर पॅनेल भेट देण्याची इच्छा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२५च्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण १२३ कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या भारतीय संघाने ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच ३९.७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचाच अर्थ, सद्यस्थितीला भारतीय संघाने ९० कोटींपेक्षा जास्त रकमेची कमाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in