नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे संपर्क साधल्याच्या चर्चा बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी खोडून काढल्या आहेत. या सर्व चर्चा खोडसाळ आणि तथ्यहीन असून भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून गंभीरला हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण सैकिया यांनी दिले.
भारताला दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर या चर्चांना जोर मिळू लागला आहे. कसोटीत भारताचा प्रशिक्षक बदलण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत, असे बोलले जात आहे. गंभीरच्या प्रशिक्षक पदाखाली खेळणाऱ्या भारताला न्यूझीलंडकडूनही ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. गेल्या १२ वर्षांत भारतावर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची वेळ पहिल्यांदा उद्भवली होती. विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या राजीनाम्यानंतर भारताला मायदेशात मालिका गमवावी लागली होती. न्यूझीलंडकडून व्हाइटवॉश पत्करल्यामुळे भारताचे २०२५ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान डळमळीत झाले. आता दक्षिण आफ्रिकेकडून हरल्यामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे भारतासाठी कठीण गोष्ट होऊन बसली आहे. सैकिया म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या चर्चा वायफळ आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. माध्यमांनी रंगवलेल्या या चर्चा आहेत. अशा कोणत्याही हालचाली बीसीसीआयमध्ये सुरू नाहीत. लोकांना वाटेल तशा गोष्टी रंगवत आहेत. गंभीरच्या प्रशिक्षक पदाखाली भारताने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मात्र दमदार कामगिरी केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक टी-२० स्पर्धेचे जेतेपद भारताने आपल्या नावावर केले आहे. मात्र गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारताने फक्त ७ कसोटी सामने जिंकले असून १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा मालिका विजयाचा रेकॉर्ड पाहता, भारताने बांगलादेशविरुद्धची मायदेशातील मालिका २-० अशी जिंकून दमदार सुरुवात केली होती. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे रोहित, विराट आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाला २-० असे हरवून भारताकडे सक्षम नेतृत्व असल्याचे दाखवून दिले होते. मात्र बावुमा, सिमोन हार्मर आणि मार्को यान्सेन यांच्या दक्षिण आफ्रिका संघाने भारताच्या मनसुब्यावर पाणी फिरले. भारताला या सामन्यात शुभमन गिलची कमतरता प्रकर्षाने जाणवली होती. गिल मानेच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकला नव्हता. त्यामुळे ऋषभ पंतला भारताचे नेतृत्व सांभाळावे लागले होते.
आता आव्हान टी-२० वर्ल्डकपचे
आता यापुढे सध्यातरी भारतासमोर कसोटी क्रिकेटचे आव्हान नसले तरी टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी भारतीय संघाला कंबर कसावी लागणार आहे. रोहित शर्माने भारताला गेल्या वर्षी हे जेतेपद जिंकून दिले होते आता ती किमया सूर्यकुमार यादवला साधावी लागणार आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना मुंबईत रंगणार आहे. त्यानंतर पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिकेशी गटसाखळीत दोन हात करावे लागतील. मात्र यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून दाखवण्याची करामत करावी लागणार आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारताच्या युवा संघाची खरी कसोटी लागणार आहे.