मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी देशांतर्गत क्रिकेटची जाण असलेल्या माजी खेळाडूंना प्राधान्य देण्यात येईल. त्यातही भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा यासाठी प्रामुख्याने विचार केला जाईल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केली. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंशी बीसीसीआयने अथवा आपण प्रशिक्षकपदासाठी कोणताही संवाद साधलेला नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यात प्रशिक्षकपदासाठी शर्यत सुरू असल्याचे समजते.
राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असून आगामी टी-२० विश्वचषकानंतर त्याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. द्रविड नोव्हेंबर २०२१ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळत आहे. प्रत्यक्षात त्याचा करार गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात आला होता. मात्र, ‘बीसीसीआय’कडून त्याला जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता द्रविडने स्वत:च करारात वाढ न करण्याचे बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे तो प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. अर्ज करण्यासाठी २७ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर या ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंनी प्रशिक्षकपदासाठी उत्साह दाखवल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती. तसेच न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगचेही नाव शर्यतीत होते. मात्र जय शहा यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी कोणीही संवाद साधलेला नाही, असे स्पष्ट केले. “भारतीय क्रिकेटच्या कानाकोपऱ्याची त्या प्रशिक्षकाला जाण असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रामुख्याने भारतीय खेळाडूंना या कामासाठी प्राधान्य दिले जाईल. ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंशी अद्याप कुणीही संवाद साधलेला नाही,” असे शहा म्हणाले.
नवा प्रशिक्षक १ जुलैपासून कार्यभार सांभाळेल आणि त्याचा करार ३१ डिसेंबर, २०२७ पर्यंतचा असेल. या कालावधीत भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक (२०२५), ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२६) आणि एकदिवसीय विश्वचषक (२०२७) अशा महत्त्वाच्या स्पर्धा खेळणार आहे. शिवाय भारतीय संघ ऑस्ट्रेलिया (२०२४-२५) आणि इंग्लंडच्या (२०२५) दौऱ्यावरही जाणार आहे. लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख असल्याने नवीन प्रशिक्षक नेमायचे झाल्यास तो या शर्यतीत वरचढ ठरू शकतो. मात्र लक्ष्मणचा एनसीएतील कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्याशिवाय गंभीर आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा मार्गदर्शक असून त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने यंदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
दरम्यान, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र दोन्ही वेळेस जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली. त्याशिवाय २०२२च्या टी-२० विश्वचषकातही भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात द्रविडही अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता २ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
कोण करू शकणार अर्ज?
- वय ६० वर्षांपेक्षा कमी, किमान ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव गरजेचा.
- अथवा ‘आयसीसी’चे पूर्ण सदस्यत्व असलेल्या कसोटी संघाचे किमान दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव.
- सहयोगी (असोसिएट्स) देश वा ‘आयपीएल’ संघाचे किमान तीन वर्षे प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करता येणार आहे.