खूशखबर! ‘त्या’ महिला क्रिकेटपटूंना BCCI देणार २० लाखांचा बोनस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेटपटूंना आनंदाची बातमी दिलीय.
खूशखबर! ‘त्या’ महिला क्रिकेटपटूंना BCCI देणार  २० लाखांचा बोनस
Published on

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेटपटूंना आनंद देणाऱ्या एका बातमीची घोषणा केली आहे. डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम झाल्यानंतर दुसरा हंगाम सुरू होईपर्यंतच्या काळात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची यावेळी मानधन वाढ करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूला गेल्या हंगामाच्या तुलनेत २० लाखांनी रक्कम वाढवून मिळणार आहे.

गतवर्षी ४ ते २६ मार्चदरम्यान डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम मुंबईत पार पडला. मुंबई इंडियन्सने या हंगामाचे जेतेपद मिळवले. यानंतर वर्षभरात मुंबईची डावखुरी फिरकीपटू साइका इशाक, अष्टपैलू अमनजोत कौर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फिरकीपटू श्रेयांका पाटील, दिल्ली कॅपिटल्सची तिथास साधू यांसारख्या खेळाडूंनी भारताकडून विविध प्रकारांत पदार्पण केले. त्यामुळे ज्या खेळाडूंना गतवर्षी १० लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते, त्यांना दुसऱ्या हंगामासाठी ३० लाख रुपये देण्यात येतील. साइका व श्रेयांका यांना मुंबई व बंगळुरूने अनुक्रमे १० लाखांत खरेदी केले होते. या दोघींनी टी-२० व एकदिवसीय प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे त्यांना आता ३० लाख रुपये मिळतील.

त्याशिवाय यंदाच्या हंगामात जे खेळाडू प्रथमच डब्ल्यूपीएल खेळतील. त्यांनी जर पुढील डब्ल्यूपीएल सुरू होईपर्यंत भारतीय संघात स्थान मिळवले, तर त्यांच्यासाठीसुद्धा हा नियम लागू असेल. एकूणच बीसीसीआयच्या या नियमामुळे महिला क्रिकेटपटूंना आर्थिक पाठबळ लाभणार असून युवा पिढीलाही प्रोत्साहन मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in