तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वृत्त आहे. हरारेसह झिम्बाब्वेच्या बहुतांश शहरांमध्ये सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आंघोळीसाठी जपून पाणी वापरण्याच्या सूचना चक्क भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच (बीसीसीआय) क्रिकेटपटूंना दिल्या आहेत.
बीसीसीआय हरारेतील पाण्याच्या समस्येबाबत अतिशय संवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पाण्याच्या कमतरतेबाबत सजग केले आहे. बीसीसीआयने खेळाडूंना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे स्पष्टपणे सांगितले. शक्य असल्यास दिवसातून एकदाच आंघोळ करावी आणि कमीतकमी पाण्याचा वापर करावा, असे क्रिकेटपटूंना सांगण्यात आले आहे.
कोणत्याही परिस्थितीत पाणी वाया जाऊ देऊ नये, असे सांगण्यात आल्याने खेळाडूंना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खेळाडूंवर अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना पाण्याची समस्या भेडसावत आहे.
पूल सेशनमध्ये कपात
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्टने म्हटले आहे की, ‘पाणी बचतीसाठी पूल सेशनमध्येही कपात करण्यात आली आहे.; सध्या हरारेमध्ये पाण्याची गंभीर समस्या असल्याबाबत भारतीय खेळाडूंना याबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय करू नका, असे खेळाडूंना सांगण्यात आले आहे. कमी वेळेत आणि कमी पाण्याने आंघोळ करा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.