दुखापत झाल्यास आता खेळाडू बदलण्याची मुभा

सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला बाह्य दुखापत झाली, तर त्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला पूर्णपणे खेळवण्याची मुभा आता संघांना असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देशांतर्गत स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. दुलीप ट्रॉफीपासून या नियमाची अंमलबजावणी होईल.
दुखापत झाल्यास आता खेळाडू बदलण्याची मुभा
Published on

मुंबई : सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला बाह्य दुखापत झाली, तर त्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला पूर्णपणे खेळवण्याची मुभा आता संघांना असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देशांतर्गत स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. दुलीप ट्रॉफीपासून या नियमाची अंमलबजावणी होईल.

या नियमानुसार सामना सुरू असताना खेळाडू गंभीर जखमी झाला व तो फलंदाजी अथवा गोलंदाजी करू शकणार नसेल, तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेत भारताच्या ऋषभ पंतच्या उजव्या पायाला चेंडू लागल्याने रक्त येत होते. तसेच सूजही आली होती. तरीदेखील पंत फलंदाजीस आला होता. तसेच पाचव्या कसोटीत ख्रिस वोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नाही, तरी एका हाताला फ्रॅक्चर बांधून फलंदाजीस आला. त्यामुळे आयसीसीसुद्धा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू करेल, असे अपेक्षित आहे.

आतापर्यंत फक्त कन्कशनमध्ये (डोक्याशी संबंधित दुखापत) बदली खेळाडू घेण्याची मुभा होती. मात्र आता रणजी, मुश्ताक अली, विजय हजारे यांसारख्या भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडू शरीराला झालेल्या दुखापतीद्वारे बदलला जाऊ शकतो. मात्र ही दुखापत बाह्य स्वरुपाची असणे गरजेचे आहे. खेळाडूला एखादा आजार किंवा शरीराच्या आतील भागाची (स्नायू ताणणे) दुखापत झाल्यास बदली खेळाडू दिला जाणार नाही. तसेच बदली खेळाडू हा जायबंदी खेळाडूप्रमाणेच असावा. म्हणजेच जर डावखुरा फलंदाज किंवा एखादा वेगवान गोलंदाज दुखापत झाला, तर त्यांच्या जागी दुसरा तसाच पर्याय संघाला शोधावा लागेल.

logo
marathi.freepressjournal.in