

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा आगामी महत्त्वाचा दौरा आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीसह एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्सकडून (सीओई) दुखापतग्रस्त खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत स्पष्ट वेळेची मागणी करणार आहेत. सीओईचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यूके दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
वार्षिक कराराचा भाग असलेले प्रमुख खेळाडू सध्या सीओईमध्ये पुनर्वसनातून जात आहेत. त्यांच्या दुखापती आणि उपलब्धतेबाबत निवड समितीला अचूक माहिती मिळत नसल्याने रणनीती आखण्यात अडचणी येत आहेत. श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराच्या उपलब्धतेबाबत निवड समिती अध्यक्षांना स्पष्टता मिळाली नव्हती. हार्दिक पंड्या आयपीएलनंतर खेळलेला नाही आणि तो एकदिवसीय विश्वचषकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो १० षटके गोलंदाजी करण्यास सक्षम असल्याचा दाखला सीओईकडून मिळेपर्यंत त्याची ५० षटकांच्या क्रिकेटसाठी निवड न करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
रोहित, विराटबाबतही चर्चा
या बैठकीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या ज्येष्ठ खेळाडूंच्या भविष्यातील भूमिकेवरही चर्चा होणार आहे. रोहित शर्माला यापूर्वीच कारकीर्दीबाबत निर्णय घेण्याबाबत सूचक संकेत देण्यात आल्याची चर्चा होती. लॉर्ड्सवरील शतकानंतर त्याच्या निवृत्तीची शक्यता तूर्तास टळली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा करार ४ ऑक्टोबरला संपत असला, तरी बीसीसीआय विश्वचषकापर्यंत सातत्य ठेवण्यास उत्सुक असल्याचे दिसते.