

नवी दिल्ली : आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. हा वाद मिटवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. दुबईत आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची भेट घेतल्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली.
आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी आशिया क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून घेण्यास भारतीय संघाने नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ही ट्रॉफी पळवून नेली होती.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केले होते.
आयसीसीच्या औपचारीक आणि अनौपचारिक अशा दोन्ही बैठकांमध्ये मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मोहसिन नक्वीसुद्धा हजर होते. औपचारिक बैठकीत हा विषय अजेंड्यावर नव्हता. परंतु माझी आणि पीसीबी प्रमुखांची भेट यावेळी आयसीसीने घडवून आणली. यावेळी आयसीसीचे अधिकारी उपस्थित होते, असे सैकिया यांनी सांगितले.
चर्चेची प्रक्रिया सुरू होणे हीच चांगली गोष्ट आहे. दोन्ही बाजूंनी बैठकीत सकारात्मक वातावरण होते. या भेटीमुळे तोडगा निघेल, याची खात्री वाटते, असे सैकिया म्हणाले.
सैकीया यांनी संबंधित आयसीसी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. परंतु विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपाध्यक्ष इमरान ख्वाजा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी या चर्चेसाठी पुढाकार घेतला. निश्चितच, गोष्टी सकारात्मक मार्गाने गेल्यास हा वाद लवकर सुटेल, असे सैकिया म्हणाले.
दरम्यान, ही ट्रॉफी सध्या दुबईतील आशिया क्रिकेट असोसिएशनच्या (एसीसी) मुख्यालयात आहे. नक्वी यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगीशिवाय ही ट्रॉफी कोणालाही देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. भारतीयांनी ही ट्रॉफी त्यांच्याकडूनच स्वीकारली पाहिजे, असे नक्वी यांचे म्हणणे आहे.
सध्या ट्रॉफीवरून असलेले मतभेद दूर झाले आहेत. त्यामुळे विविध पर्यायांवर काम सुरू होईल. दोन्ही बाजूंनी पर्याय सुचवले जातील आणि या विषयावर तोडगा काढला जाईल, असे सैकिया म्हणाले.