बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी दावेदारी; इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे आता एक पाऊल पुढे टाकताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी दावेदारी करणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी दावेदारी; इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा
Credits: Twitter
Published on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे आता एक पाऊल पुढे टाकताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी दावेदारी करणार आहेत.

आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपुष्टात येणार असून नवे अध्यक्ष म्हणून शहा यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, शहा यांनी सर्व प्रथम अर्ज करणे गरजेचे आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याकरिता २७ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. ‘आयसीसी’ अध्यक्षांना प्रत्येकी दोन वर्षांचे तीन कार्यकाळ पूर्ण करता येतात. परंतु न्यूझीलंडच्या बार्कले यांनी चार वर्षे आणि दोन कार्यकाळांनंतर अध्यक्षपदासाठी पुन्हा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये आय़सीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२२ मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली.

आयसीसीच्या नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ मते आहेत आणि आता विजेत्यासाठी नऊ मतांचे बहुमत (५१%) आवश्यक आहे. “सर्वांना २७ ऑगस्टपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करावे लागतील. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल. नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होईल,” असे आयसीसीने म्हटले.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा शहा यांना पाठिंबा

जय शहा यांना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अन्य कुणीही उमेदवारीसाठी अर्ज भरला नाही, तर शहा यांची बिनविरोध निवड होऊ शकते. शहा हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उपसमितीचे प्रमुख आहेत. मतदान करणाऱ्या १६ पैकी बहुतांश सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सध्या, शहा यांच्या बीसीसीआय सचिवपदाच्या कार्यकाळात एक वर्ष शिल्लक आहे ज्यानंतर त्यांना ऑक्टोबर २०२५ पासून अनिवार्य तीन वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी घ्यावा लागेल.

जय शाह हे वयाच्या ३५व्या वर्षी आयसीसी इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष होऊ शकतात. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी यापूर्वी आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in