

मुंबई : दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड (सेना देश) यांसारख्या प्रमुख देशांमधील महत्त्वाच्या मालिकांपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना योग्य विश्रांती मिळण्यासह तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसे सराव सामने मिळतील याची खात्री करण्यासाठी बीसीसीआय काम करेल, अशी माहिती सचिव सैकिया यांनी गुरुवारी दिली.
“दुखापत व्यवस्थापनाबाबत भारतीय क्रिकेटमध्ये संवादाचा कोणताही अभाव नाही. मात्र, खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी भविष्यातील दौरा कार्यक्रमात (एफटीपी) सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय क्रिकेटमध्ये सर्व विभागांमध्ये उत्तम समन्वय असून संघ योग्य दिशेने वाटचाल करत आहे. वर्षात खूप जास्त सामने खेळले जाणे हे एकमेव मुख्य आव्हान सध्या मंडळासमोर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर बैठकीसाठी जाणाऱ्या एफटीपी प्रतिनिधींना ‘सेना’ देशांतील महत्त्वाच्या मालिकांआधी खेळाडूंना योग्य विश्रांती मिळेल, तसेच मैत्रीपूर्ण सराव सामने आणि हवामानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ उपलब्ध होईल अशा पद्धतीने वेळापत्रक आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे सैकिया म्हणाले.
या बैठकीत भारतीय संघाने इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये केलेल्या कामगिरीवर चर्चा झाली. आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत ०-२ असा झालेला पराभव, तसेच इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत १-४ आणि एकदिवसीय मालिकेत १-२ झालेल्या पराभवानंतर संघाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सैकिया यांनी मान्य केले. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करता यावी यासाठी रणनीती आणि रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
खेळाडूंच्या तंदुरुस्ती पातळीबाबत धोरण आणि नियमावली राखण्यासाठी तसेच संघाच्या हितरक्षणासाठी ही चर्चा झाली. “सीओई आणि भारतीय संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही अविश्वास किंवा संवादाचा अभाव नाही, परंतु खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापती चिंताजनक आहेत. सीओईमध्ये सध्या स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिन प्रमुखाचे पद रिक्त असले, तरी त्यामुळे कामात कोणताही अडथळा येत नाही. त्या पदासाठी उच्च दर्जाची पात्रता आवश्यक असून योग्य व्यक्तीचा शोध सुरू आहे, तोपर्यंत १६ तज्ज्ञांचे पथक खेळाडूंच्या पुनर्वसन आणि फिटनेस सुविधांची पूर्ण काळजी घेत आहे, असेही सैकिया यांनी स्पष्ट केले.