
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारताचा कर्णधार पाकिस्तानमध्ये जाणार की नाही, याविषयी संभ्रम अद्याप कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजीत साइकिया यांनीही यासंबंधी स्पष्ट माहिती देण्याचे टाळले.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार आहे. मात्र भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. यावर आयसीसीने शिक्कामोर्तब केले असले, तरी प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व संघांचे कर्णधार पत्रकार परिषदेसाठी यजमान देशात जातात. तसेच सर्व कर्णधारांचे चषकासह फोटशूट करण्यात येते. परराष्ट्र मंत्रालयाने रोहितला यासाठी परवानगी नाकारल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. साइकिया मात्र यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. अद्याप रोहितच्या पाकिस्तानला जाण्यावरून आमचा परराष्ट्र मंत्रालय अथवा आयसीसीशी कोणताही संवाद झालेला नाही, असे साइकिया यांनी स्पष्ट केले.
भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव
नियमानुसार जो संघ आयसीसीच्या स्पर्धांचे यजमानपद भूषवतो, त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर असते. मात्र भारतीय संघ यास विरोध करत असल्याची बातमी पसरली होती. बीसीसीआयचे सचिव साइकिया यांनी मात्र या अफवांनाही धुडकावून लावले. आयसीसीच्या नियमानुसार आम्ही जर्सी परिधान करू, त्यावर कोणत्याही देशाचे नाव असल्याने काहीही फरक पडणार नाही, असे साइकिया म्हणाले. त्यामुळे भारताच्या जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचे नाव असेल, हे स्पष्ट झाले.