ग्रहण लवकरच संपेल, संयम बाळग! ; लालचंद राजपूत यांचा मोलाचा सल्ला

सातत्याने सुमार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचा मोलाचा सल्ला
ग्रहण लवकरच संपेल, संयम बाळग! ; लालचंद राजपूत यांचा मोलाचा सल्ला

मुंबईकर सूर्यकुमार यादव गेल्या २६ दिवसांतील सहा सामन्यांत चक्क चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय लढतीत सूर्यकुमार पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धसुद्धा त्याच्यावर अशी वेळ ओढवली. या सर्व घडामोडींमुळे सध्या क्रीडाविश्वात सूर्यकुमार यादवचीच चर्चा रंगत असून त्याला मुंबई इंडियन्ससह भारतीय संघातूनही बाहेर करण्यात यावे, अशी मागणी काही जण करत आहेत. तर काही चाहते त्याची या कठीण काळात पाठराखणही करत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनीही सूर्यकुमारला पाठिंबा दर्शवताना संयम बाळगण्याचे सुचवले आहे.

३२ वर्षीय सूर्यकुमारला १७ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्कने शून्यावर पायचीत पकडले. त्यानंतर १९ व २२ मार्च रोजी झालेल्या लढतींमध्येही तो भोपळा न फोडता बाद झाला. आयपीएलमध्ये २ एप्रिल रोजी बंगळुरू, तर ८ एप्रिल रोजी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार अनुक्रमे १५ आणि १ धाव करून बाद झाला. तर नुकताच दिल्लीविरुद्ध त्याने शून्यावरच विकेट गमावली. म्हणजेच गेल्या सहा लढतींमध्ये त्याने फक्त १६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार फलंदाजीस येताना त्याच्या मनात असंख्य विचार सुरू असल्याचे राजपूत यांना जाणवले. ६१ वर्षीय राजपूत यांनी सूर्यकुमारचा खेळ फार पूर्वीपासून जवळून पाहिला आहे. मुंबई टी-२० लीगमध्ये सूर्यकुमार ज्या संघाकडून खेळायचा, त्या संघाचे प्रशिक्षकपद राजपूत यांनी भूषवलेले आहे.

“प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत अशी वेळ येतेच. सूर्यकुमारने गतवर्षी टी-२० विश्वचषकामध्ये छाप पाडली. परंतु यंदा पहिल्याच चेंडूवर सातत्याने बाद होत असल्याने त्याच्या अपयशाविषयी सगळीकडे चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. तो लवकरच यातून सावरेल. सूर्यकुमार मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकतो,” असे राजपूत म्हणाले.

“सूर्यकुमारला या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी अवघी एक अर्धशतकी खेळी पुरेशी आहे. मात्र पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यापूर्वी त्याने यापूर्वी काय घडले, याचा विचार न करणे गरजेचे आहे. संयम बाळगून त्याने सुरुवातीचे ६-७ चेंडू निर्धाव खेळले, तरीही हरकत नाही. कारण खेळपट्टीवर स्थिरावल्यावर तो २-३ चेंडूंच्या अंतरातच धावा व चेंडूंमधील अंतर कमी करू शकतो,” असेही राजपूत यांनी सांगितले. त्याशिवाय सध्या स्पर्धा फार वाढत असली तरी आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने सूर्यकुमार, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस असल्याचे राजपूत यांनी नमूद केले.

टी-२० क्रमवारीत सूर्यकुमारचे अग्रस्थान कायम

एकीकडे सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत असले तरी आयसीसीच्या जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादवने अग्रस्थान कायम राखले आहे. आयसीसीने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार सूर्यकुमारच्या नावावर ९०६ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद रिझवानच्या (पाकिस्तान) खात्यात ८११ गुण आहेत. अव्वल १०मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in